इसिसचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादीचा खात्मा?


वॉशिंग्टन – अनेक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी उत्तरपश्चिम सीरियामध्ये अमेरिकेने चालवलेल्या एका मोहिमेदरम्यान दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादीचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर एक ट्विट केले होते. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये काहीतरी मोठे घडले असल्याचे म्हटले आहे. परंतु, बगदादीशी संबंधित आणखी कोणतेही खुलासे करण्यात आलेले नाहीत. एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एक मोठी गोष्ट सांगणार असल्याचे व्हाईट हाऊसने ट्विट केल्यामुळे ट्रम्प बगदादीच्या मृत्यूसंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वीही बगदादीचा खात्मा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार पश्चिम सीरियामध्ये एका मोहिमेदरम्यान अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी पाकिस्तानच्या एबटाबाद येथे करण्यात आलेल्या कारवाईप्रमाणेच हे ऑपरेशनही होते. छाप्यात बगदादीने आत्मघातकी हल्ला केल्याचेही अहवालात नमूद केले आहे. त्याच्या शरीराच्या डीएनए चाचणीनंतरच याची पुष्टी होईल. सीरियाच्या सूत्रांनीही बगदादीच्या मृत्यूसंदर्भात वृत्त दिले आहे.

Leave a Comment