व्हिडीओ व्हायरल; प्रचारसभे दरम्यानच ओवेसींनी धरला ठेका


औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अवघ्या काही तासातच संपणार असून मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. महाराष्ट्रात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. अशातच सोशल मीडियात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ओवेसी यामध्ये चांगलेच मुडमध्ये असून गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. त्यांनी हा डान्स औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात प्रचारसभा घेतल्यानंतर केल्याचे सांगितले जात आहे.


असदुद्दीन ओवेसी प्रचारसभेला संबोधित केल्यानंतर मंचावरुन खाली उतरताना व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दिसत आहेत. त्यावेळी “मिया मिया, मिया भाई” हे गाणे सभेच्या ठिकाणी लागते. ओवेसी ते ऐकून पायऱ्या उतरत असतानाच काही सेकंद त्यावर ठेका धरत नाचत आहेत. ओवेसी यांच्या हातात यावेळी फुलांचा हारही दिसत आहे. ओवेसी यांनी औरंगाबाद येथील सभेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 1993 मधील मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारायला हवा, अशीही मागणी केली. आपल्या प्रचारातील भाषणांमध्ये मोदी विवादास्पद विषयांवर वक्तव्य करत आहेत. त्यांना त्यातून समाजातील एका घटकाला विशिष्ट संदेश द्यायचा असल्याचेही आरोप त्यांनी केला.

ओवेसी म्हणाले, 1993 च्या मुंबई स्फोटातील पीडितांना मागील सरकारांनी न्याय दिला नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. आता हे प्रकरण बंद झाले आहे. आरोपींना शिक्षाही झाली आहे. पण अजूनपर्यंत मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही. यावर पंतप्रधान मोदी कधी काम करणार आहेत?

Leave a Comment