अशा पद्धतीने शोधा तुमचे मतदार यादीतील नाव


मुंबई – 21 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सरकारकडून मतदार जनजागृती होत आहे. विधानसभा मतदार यादीत जर तुम्हाला तुमचे नाव ऑनलाईन पद्धतीने शोधायचे असेल तर, आम्ही जी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुमचा वेळ नक्की वाचेल. मतदारांना आता ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव आहे की, नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. तब्बल ८.९५ कोटी मतदार यंदा महाराष्ट्रात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नव्या मतदारांची संख्याही यामध्ये जास्त असणार आहे. मतदारांना मतदानावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा सर्व गोंधळ होण्याआधीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले मतदान केंद्र पाहू शकता.

अशी मिळवा मतदान केंद्राची माहिती – मतदान केंद्राबद्दल भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर एका क्लिकवर माहिती मिळेल. तुम्हाला येथे मतदाराचे नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भराव्या लागणार आहेत.

मतदानासाठी लागणारी कागदपत्रे – मतदान करताना प्रत्येक मतदाराला सोबत ओळखपत्र असणे गरजेचे आहे. मतदाराकडे ओळखपत्र नसेल तर त्या मतदाराला मतदान करता येणार नाही. तुम्ही मतदानाचा हक्क भारतीय निवडणूक आयोगाने ग्राह्य ठरवलेल्या ओळखपत्रांच्या आधारे बजावू शकता. तुमच्याकडे यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायविंग लायसन्स ), पॅनकार्ड, आधारकार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे किंवा टपाल कार्यालयाचे पासबुक, मनरेगा जॉबकार्ड, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत महसूल निर्मिती अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे.

मतदारांसाठी विशेष व्होटर हेल्पलाईन क्रमांक – मतदारांसाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांक सरकारने जारी केला आहे. यावर तुम्हाला SMS करून माहिती मिळवता येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त ‘पीडब्ल्यूडी’ या ॲपचा वापर दिव्यांग मतदारांना करता येणार आहे. दिव्यांग मतदारांना यामध्ये मतदान केंद्र शोधणे, व्हीलचेअरची मागणी करणे, मतदार नोंदणी करणे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment