आदित्य ठाकरेंकडून शरद पवारांच्या पावसातील सभेचे कौतुक


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. शरद पवार यांचे युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. बरंच काही शरद पवारांकडून शिकण्यासारखे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी सुरु असतानाच आदित्य ठाकरेंचा मुंबईतील धारावीमध्ये रोड शो झाला. त्यांनी यावेळी शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाचे कौतुक केले. सलमान खानचा बॉडीगार्ड शेराही आदित्य ठाकरेंच्या या रोड शोमध्ये सहभागी झाला होता.

आदित्य ठाकरेंना यावेळी शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, शरद पवारांवर मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही. खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. माझ्या आजोबांचे ते मित्र आहेत. शरद पवारांनी पावसात भिजून काल जे काही केले आहे, ते खरंच सगळ्यांनी कौतुक करण्यासारखे आहे.

एकीकडे शरद पवारांचे आदित्य ठाकरे कौतुक करत असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. तेव्हा 70 कोटींचा भ्रष्टाचार जर केला नसता तर पावसात भिजायची वेळ तुमच्यावर आली नसती, अशा शब्दात पवारांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

Leave a Comment