रितेश देशमुखने व्हायरल केला ‘हाऊसफुल ४’च्या सेटवरील ‘मस्तीछाप’ व्हिडिओ


अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर ‘हाऊसफुल ४’ आगामी चित्रपटाच्या सेटवरचा एक धमाल व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते या मस्तीछाप व्हिडिओला शेअर आणि लाईक करीत आहेत. रितेशसह अक्षय कुमार, बॉबी देओल, अभिनेत्री क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

अक्षय कुमार आणि बॉबी रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत सेटवर झोपा काढताना दिसत आहेत. आपल्या कॅमेऱ्यात रितेश त्यांना कैद करायला सुरुवात करतो. हे मेहनती कलाकार किती मेहनत करीत असल्याचे म्हणत झोपलेल्या या दोघांना तो शूट करतो.


अक्षय आणि बॉबीलाही रितेश आपल्या झोपेतील व्हिडिओ घेत आहे याची जाणीव होते आणि ते अंमळ ओशळताना दिसतात. जेव्हा कलाकार सेटवर शूट करीत असतात तेव्हा लायटिंग, सेटींग यामध्ये बराच वेळ जातो. अशावेळी झोटी वामकुक्षी कलाकार घेत असतात. याचाच फायदा उठवत रितेशने मजा मस्ती केली आहे.

‘हाऊसफुल ४’ हा ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती साजिद नादियाडवाला यांनी केली आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर, जेमी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

Leave a Comment