ज्या ‘लुंगी’ला बाळासाहेबांनी केला होता विरोध तिच नेसून आदित्यचा प्रचार


मुंबई – सध्या वरळी मतदारसंघात मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य लोकांविरोधात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ हे आंदोलन बाळासाहेबांनी उभारले होते. ज्या दाक्षिणात्य लुंगीचा बाळासाहेबांनी विरोध केला, आदित्य ठाकरे यांनी तीच लुंगी घालून वरळीतील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली, तरी महाराष्ट्रापासून मुंबईची नाळ ही वेगळी होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठी लोकांसोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही वाढत होती. बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेने मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ हे आंदोलन केल्यामुळे मराठी भाषिकांची शिवसेना असे समीकरण झाले. पुढे याच शिवसेनेला महापालिका, राज्यात आणि केंद्रात सत्ता स्थापन करता आली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी दाक्षिणात्य लोकांविरुद्ध एल्गार पुकारला होता. पण आता याला बगल देत दाक्षिणात्यांच्या मतांची गरज शिवसेनेला वाटू लागली असल्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांची मते मागताना दिसत आहेत. याशिवाय, आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ गेल्या काही दिवसांपूर्वी वरळी मतदारसंघात लागलेल्या ‘केम छो वरली’ अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ फक्त गुजरातीच नव्हे तर मराठी व्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Comment