या ठिकाणी सेल्फी काढल्यावर मिळतील ५१ हजार रुपये


सध्याच्या घडीला लग्नाआधी ‘प्री वेडिंग फोटोशूट’ करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लग्नाआधीचे सुंदर क्षण कायमस्वरुपी लक्षात राहावेत, यासाठी ‘प्री-वेडिंग’ फोटोशूट केले जाते. पण ‘प्री वेडिंग फोटोशूट’ करण्याची एक अजबच संकल्पना मध्यप्रदेशमध्ये रुजू लागली आहे. मुलांना लग्न करण्याआधी येथील चक्क त्यांच्या घरातील शौचालयात उभे राहून छायाचित्र काढावे लागत आहे.

‘मुख्यमंत्री विवाह योजना’ मध्यप्रदेश सरकारने तेथील मुलींसाठी सुरु केली. तेथील मुलींना या योजनेअंतर्गत लग्नासाठी सरकारतर्फे ५१ हजार रुपयांचा निधी दिला जातो. पण या योजनेसाठी एक अट आहे. हा निधी जर मिळवायचा असेल, तर मुलीच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाला शौचालयासोबतचा सेल्फी काढून लाभार्थी अर्जाला तो जोडावा लागतो.

शौचालयात उभा असलेला सेल्फी नवऱ्या मुलाने काढण्याचा नियम केवळ ग्रामीण भागात नसून, या नियमाची अंमलबजावणी भोपाळ महानगरपालिकेकडूनही केली जात आहे. याआधी मध्य प्रदेश सरकारच्या वतीने २०१३ साली आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी ‘मुख्यमंत्री विवाह योजना’ जाहीर करण्यात आली होती. पण, छायाचित्राचा नियम अलीकडे लागू करण्यात आला आहे. लग्नाआधीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी केल्या जाणाऱ्या फोटोशूट सारखे हे नव्या पद्धतीचे फोटो शूट नसले, तरी ‘प्री वेडिंग फोटोशूट’ म्हणूनच हा नवा प्रकार सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Leave a Comment