फडणवीसांच्या सौभाग्यवतींनी खरेच गायले होते मनसेचे प्रचारगीत?


मुंबई : सध्या सोशल मीडियावर मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी मनसेचा प्रचार केल्याच्या अफवा व्हायरल झाल्या आहेत. अमृता फडणवीस एका कार्यक्रमात मनसेचे प्रचारगीत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. पण याची सत्यता पडताळली असता याच्या मूळ व्हिडीओशी छेडछाड हा व्हिडीओ बनवल्याचे समोर आले आहे.

पार्श्वगायनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना रस असल्याची कल्पना सर्वांनाच आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींचे काही म्युझिक व्हिडीओही रिलीज झाले आहेत. रसिक प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर अमृता फडणवीसांच्या आवाजावर उमटली आहे.

अशातच, मनसेच्या प्रचारासाठी अमृता फडणवीस गाणे गात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. अमृता फडणवीस भाजपवर घणाघात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार कसा करु शकतात, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आला. अखेर ‘फॅक्ट क्रेसेंडो मराठी’ या फेसबुक पेजने या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली.

संबंधित व्हिडीओ फेक असून मूळ व्हिडीओशी छेडछाड करुन तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम ‘उमंग 2018’ मध्ये अमृता फडणवीस यांनी ‘फिर से’ हे गाणे सादर केले होते. या परफॉर्मन्सच्या व्हिडीओला एडिट करुन त्यामध्ये बॅकग्राऊण्डला मनसेच्या गाण्याचा ऑडिओ टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कन्याही उपस्थित होती.

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी अमृता फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने भाजपला याचा फायदा होईल, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला अमृता फडणवीस जाणार असल्याचे त्यांनीच पूर्वी सांगितले असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment