आधी ताडोबा आणि मग न्यूझीलंडच्या सफरीवर जाणार वहिदा रेहमान आणि आशा पारेख


या अभिनेत्री आता बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये दिसत नसल्या, तरी अनेक समारंभांच्या माध्यमातून त्यांचे दर्शन अधूनमधून घडत असते. वहिदा रहमान, आणि आशा पारेख या एके काळी बॉलीवूडमधील अतिशय नावाजलेल्या अभिनेत्री सध्या बॉलीवूडच्या झगमगाटापासून लांबच असल्या, तरी त्यांचे व्यक्तिगत आयुष्य मात्र आजही तितकेच व्यस्त आहे. या दोघी अभिनेत्री आणि एके काळी बॉलीवूडची ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून नावाजलेल्या अभिनेत्री हेलन एकमेकींच्या जिवलग सख्या असून, वर्षातून किमान एकदा तरी एकत्र सुट्टीवर जाण्याचा त्यांचा आवर्जून प्रयत्न असतो. वहिदाजी आणि आशाजी यांना प्रवासाची आणि ठीकठिकाणच्या खासियती असलेल्या पाककृती चाखून पाहण्याची अतिशय आवड आहे. आपली ही हौस या दोघी देशी-विदेशी प्रवास करीत पूर्ण करीत असतात.

आता देखील या दोघी सखी ताडोबा अभयारण्याला भेट देण्याच्या तयारीत असून, तिथे सुमारे एक आठवडाभर मुक्काम करण्याची त्यांची योजना आहे. त्यानंतर पंधरा दिवसांच्या भ्रमंतीसाठी या दोघी मैत्रिणी नोव्हेंबर महिन्यामध्ये न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. या पूर्वीही वहिदाजी आणि आशाजींनी अनेकदा सुट्टीच्या निमित्ताने एकत्र प्रवास केले असून, काही काळापूर्वीच त्या दोघी आणि अभिनेत्री हेलेन टर्की (तुर्कस्तान)ला भेट देऊन आल्या होत्या. या मैत्रिणींनी या प्रवासाच्या दरम्यान स्कँडीनेव्हियन क्रुझचा हे आनंद लुटला होता. वहिदाजी आणि आशाजी सुट्ट्यांच्या निमित्ताने अलास्का आणि कॅनडा येथेही भटकंती करून आल्या आहेत.

‘आपण एकट्या असलो, तरी वहिदाजींना दोन अपत्ये आहेत, हेलेन याही आपल्या परिवारासमवेत व्यस्त असतात. तरीही आम्ही एकमेकींच्या सतत संपर्कात असतो’, असे आशा पारेख म्हणतात. या तिघी जिवलग सख्या अनेकदा लंच, डिनरसाठीही भेटत असतात. अलीकडेच मुंबईमध्ये आयोजित, मुलांसाठी असलेल्या एका रियालिटी शोच्या निमित्ताने वहिदा रेहमान आणि आशा पारेख एकत्र दिसल्या होत्या. या तिघी सख्या कपिल शर्मा शो या मालिकेच्या एका भागामध्येही दिसल्या होत्या. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही या अभिनेत्रींची मैत्री केवळ टिकलीच नाही, तर सरत्या काळासोबत आणखी दृढही झाली आहे. अजूनही या तिघी मैत्रिणी एखाद्या पुरस्कार वितरण समारंभाच्या किंवा टीव्ही स्पेशल्सच्या निमित्ताने एकत्र येत असतात.

Leave a Comment