अनेक विकारांवर उपयुक्त ‘पादहस्तासन’


‘पद’ म्हणजे पावले, किंवा पाय आणि ‘हस्त’ म्हणजे हात, त्यामुळे शरीराच्या या दोन्ही भागांचा उपयोग करून ‘पादहस्तासन’ केले जाते. हे आसन करताना ताठ उभे राहून सावकाशीने श्वास सोडत पुढील बाजूला कंबरेतून झुकत दोन्ही हातांचे पंजे पायाच्या तळव्यांच्या शेजारी टेकविले जातात. ज्यांना या आसनाचा सराव नसतो, त्यांना सुरुवातीला पुढे झुकून हाताचे पंजे जमिनीवर टेकविणे सहज जमत नाही. पण जसजसा सराव वाढत जातो, तसे हे आसन सहजसाध्य होऊ लागते. हे आसन पायांच्या स्नायूंना (hamstrings) बळकटी देणारे आहे. पाठीच्या स्नायूंना आवश्यक व्यायाम देणारे आणि पोटावरील चरबी कमी करण्यास सहायक असे हे आसन आहे.

पचनासंबंधी तक्रारी असल्यास त्या कमी करण्यासाठी हे आसन सहायक आहे. मुलांच्या वाढीव वयामध्ये उंची चांगली वाढावी यासाठी देखील हे आसन अतिशय महत्वपूर्ण आहे. या आसानामध्ये पुढच्या बाजूला पायाच्या दिशेने झुकले असता मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीनेही हे आसन अतिशय उपयुक्त आहे. पादहस्तासन करण्यापूर्वी काही आसने केली गेल्यास पादहस्तासन अधिक सहज केले जाऊ शकते. यासाठी हे आसन करण्यापूर्वी सूर्यनमस्कार, उत्तानासन, पश्चिमोत्तानासन इत्यादी आसनांचा सराव केल्याने पादहस्तासन अधिक सहज करता येऊ शकते.

ज्यांना कंबरेतून पुढे झुकणे काहीसे कठीण जाते, त्यांनी सुरुवातीलाच झटक्याने कंबरेतून खाली वाकणे, झटक्याने वर येणे हे प्रकार टाळायला हवेत. हे आसन सावकाशीने झुकत करायचे आहे. तसेच हातांचे पंजे जमिनीवर टेकत नसल्यास टाचेच्या वर, घोट्याचा भाग हातांनी पकडावा. सरावाने हाताचे पंजे जमिनीला टेकू लागतात. हे आसन पूर्णस्थितीमध्ये आल्यानंतर काही क्षण त्याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर प्रारंभिक स्थितीमध्ये येताना श्वास घेत सावकाश वर यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment