योग्य व्यायाम आणि आहार असूनही वजन कमी होत नसल्यास…


वजन कमी करायचे असल्यास त्यासाठी योग्य आहार पद्धती आणि त्याच्या जोडीला योग्य व्यायाम आवश्यक असतो हे आपल्याला माहितीच आहे. पण काही व्यक्तींच्या बाबतीत आहार आणि व्यायाम सगळे काही व्यवस्थित आखल्याप्रमाणे सुरु असले, तरी त्यांचे वजन मात्र म्हणावे तसे कमी होत नाही. त्यामुळे अनेकदा या व्यक्ती निराशही होऊ लागतात, आणि क्वचित वजन कमी करण्याचे प्रयत्न सोडूनही देतात. म्हणूनच योग्य आणि आवश्यक तितका व्यायाम करूनही वजन कमी होत नसले, तर त्यासाठी काही कारणे विचारात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण अवलंबलेल्या व्यायामाच्या पद्धतीमध्ये विविधता आणणे गरजेचे आहे.

एखादा व्यायामप्रकार करताना सुरुवातीला शरीराला त्याची सवय नसल्याने शरीर अधिक उर्जा खर्च करीत असते. पण एकदा शरीराला या व्यायामाची सवय झाल्यानंतर हा व्यायाम करण्यामध्ये शरीराला फारसे श्रम जाणवत नाहीत. तेव्हा शरीर म्हणावे तितकी उर्जा खर्च करीत नाही, आणि त्यामुळेच वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी व्यायामामध्ये शक्य तितकी विविधता आणावी. यासाठी आठवड्यातून तीन दिवस ‘कार्डियो’ प्रकारात मोडणाऱ्या व्यायामासाठी, तर किमान दोन दिवस स्ट्रेंग्थ ट्रेनिंग साठी दिले जाणे आवश्यक आहे. कार्डियोमध्ये देखील रनिंग, पोहणे, सायकलिंग, अश्या निरनिराळ्या व्यायामप्रकारांचा आळीपाळीने समावेश करता येईल.

वजन कमी करण्यासाठी आपला आहार व्यवस्थित आखण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर आहाराची आखणी करताना आपल्या शरीराला दिवसभराच्या कामासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत याचा अंदाज घेणेही आवश्यक आहे. या आवश्यक कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीज अन्नाच्या माध्यमातून घेतल्या गेल्या, तर उर्वरित उर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शरीर त्यातील चरबीचा वापर करू लागते, आणि त्यामुळे वजन कमी होते. दिवसभरात आपण किती कॅलरीज घेतो याकडे जर लक्ष दिले गेले नाही, तर आपल्याही नकळत शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीजपैकी कितीतरी अधिक कॅलरीज सेवन केल्या जातात, आणि म्हणूनच वजन म्हणावे तितके कमी होत नाही. तसेच व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायाम केल्यानंतरचा आहार कश्या प्रकारचा आहे हे पाहणेही अगत्याचे आहे. व्यायाम कधीही रिकाम्या पोटी केला जाऊ नये. व्यायामासाठी आवश्यक ताकद, व्यायामापूर्वीच्या आहाराने मिळत असते. तसेच व्यायामानंतरही योग्य स्नॅक घेतला जाणे आवश्यक असते. तसेच शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी योग्य मात्रेमध्ये पाणी पिणेही आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे अनेक मंडळी दिवसभरामध्ये ठरल्या वेळेला व्यायाम केला, की तितकाच व्यायाम संपवून त्यानंतर उरलेला वेळ फारशी हालचाल न करताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी आपण केला तेवढाच व्यायाम पुरेसा असल्याचाही समज अनेकांमध्ये आढळतो. पण हा समज चुकीचा असल्याचे तज्ञांचे मत आहे. तज्ञांच्या मते आपण करीत असलेल्या व्यायामाच्या खेरीज शरीराची दिवसभरामध्ये जितकी हालचाल होत राहील तितका जास्त उपयोग वजन कमी करण्यासाठी होत असतो. तसेच आपण करीत असलेल्या व्यायामाखेरीज दिवसभर सक्रीय राहिल्यानेही शरीरातील अतिरिक्त कॅलरीज खर्च होऊन वजन कमी होण्यास मदत होत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment