जेव्हा टेनिस कोर्टवरच होते फेडररची फजिती


अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने दमदार खेळ केला. त्याने स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या विरोधात पहिल्यांदाच खेळताना फेडररला जोरदार टक्कर दिली. फेडरर विरोधातील सामन्यात पहिलाच सेट सुमितने जिंकला होता. पण त्याला त्यानंतर सामना जिंकणे शक्य झाले नाही. फेडररसारख्या बलाढ्य खेळाडूला सुमितने विजयासाठी झुंजवल्यामुळे सध्या सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण फेडरर सामना सुरू असताना एकाच वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले.


खेळाडू सामना सुरू असताना दोन सेटच्या दरम्यान पाणी पिण्याची विश्रांती घेतात. ते त्यावेळी बाजूला बसतात. फेडररही त्याचप्रमाणे पाणी पिण्यासाठी बाकावर बसला. दोन बाटल्या त्याच्या पुढ्यात पडलेल्या असल्यामुळे एक बाटली पाणी पिण्यासाठी त्याने उचलली आणि दुसरी बाटली खाली ठेवली. खाली ठेवलेली बाटली नीट न ठेवल्यामुळे पडली आणि घरंगळत फेडरर बसलेल्या बाकाच्या खालून मागच्या बाजूला गेली. पण फेडररला काही समजू शकले नाही. बाटली नेमकी गेली तरी कुठे? अशाप्रकारचे भाव चेहऱ्यावर आणत फेडरर बाकाखाली वाकून बघू लागला. त्यानंतर त्याने टेनिसच्या रॅकेटने बाटली पुढे ओढण्याचा प्रयत्नदेखील केला, पण त्याला ते शक्य झाले नाही. अखेर तेथील बॉलबॉयने मागच्या बाजूला आलेली बाटली फेडररला उचलून आणून दिली. फेडररची झालेली फजिती पाहून काही काळ चाहत्यांमध्ये हशा पिकल्याचेही पहायला मिळाले.

Leave a Comment