पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांची माथी भडकवणार जावेद मियांदाद


कराची : केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. भारताने हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने सगळ्या देशांची मदत मागितली, पण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी अपयशच पडल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने आता काश्मीर प्रश्नात नाक खुपसले आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद भारताविरुद्ध भडकवणार आहे. मी काश्मिरी जनतेला पाठिंबा देण्यासाठी नियंत्रण रेषेवर (एलओसी) जाणार आहे. काश्मीरला कोणीही पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही. काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. काश्मिरींवर भारताकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध मी आंदोलन करणार असल्याचे वक्तव्य जावेद मियांदादने केले आहे.

जगाचे लक्ष काश्मीरच्या परिस्थितीकडे जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या आंदोलनात जगातील इतर खेळाडूंनीही सामिल व्हावे. माझ्यासोबत ज्यांना यायचे आहे, त्यांनी यावे. काश्मिरींचा संघर्ष संपणार नाही. नवीन देश जगात बनत राहतील. जशाप्रकारे पाकिस्तान बनणे कोणीही रोखू शकले नाही, त्याच प्रकारे आझाद काश्मीर बनणेही कोणी रोखू शकणार नसल्याचे मियांदाद म्हणाला.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा कर्णधार सरफराज अहमद यानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या होत्या. शोएब अख्तरने ट्विटसोबत डोळ्याला पांढरी पट्टी लावलेल्या एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरही एक संदेश लिहिण्यात आला आहे. बलिदान म्हणजे काय हे तूला पाहून समजते. तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना. जगण्यासाठीचा महान उद्देश #Kashmir ‘असे कॅप्शन शोएबने फोटोला दिले होते.

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही याआधी काश्मीरच्या मुद्द्यावर बरळले होते. काश्मीरच्या आमच्या बंधूंसोबत संपूर्ण पाकिस्तान आहे. या कठीण काळात अल्लाहने काश्मिरींचा बचाव करावा, अशी प्रार्थना मी करतो, असे सरफराज बकरी ईदच्या नमाजनंतर म्हणाला. काश्मिरी जनतेएवढच दु:ख आणि यातना आम्हालाही झाल्या आहेत. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.

काश्मिरींना संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. त्यांना आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेले आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले होते.

Leave a Comment