सिद्धार्थ-प्रथमेशच्या ‘खिचिक’चा गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ


एका आगामी मराठी चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब दोघेही एकत्र येणार असून आता दोन विनोदी कलाकार एकाच चित्रपटात झळकणार असल्यामुळे त्या चित्रपटाचे नाव देखील हटकेच असायला हवे. त्यामुळेच त्यांच्या आगामी चित्रपटाचे ‘खिचिक’ असे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आल्यानंतर या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले होते.
त्यानंतर या चित्रपटातील ‘काजळली रात खुळी, बेहेकला जमाना’ असे धमाल शब्द असलेले ‘खिचिक झाले पोट्ट्याले’ हे ‘खिचिक’ या चित्रपटातील गाणे यूट्यूबवर सध्या धुमाकूळ घालत आहे. एका दिवसातच श्रुतिका लोंढेवर चित्रीत झालेले हे गाणे तीन लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून त्यावर भरभरुन प्रतिक्रिया येत आहे.

चित्रपटाची निर्मिती कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी केली असून पराग जांभुळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन प्रीतम एसके पाटील यांनी केले आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांच्यासोबतच पॉला मॅक्ग्लिन, सुदेश बेरी, अनिल धकाते, रसिका चव्हाण, शिल्पा ठाकरे, यश खोंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे गाणे आदर्श शिंदे आणि श्रुती जकाती यांनी गायले आहे, तर दत्ता गुंजाळ यांच्या शब्दांना अभिषेक-दत्ता यांनी संगीतबद्ध केले आहे.