सोशल मीडियावर आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल’चा धुमाकुळ


बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी अभिनेता आयुष्मान खुराना ओळखला जातो. आयुष्मानने दमदार कथानक आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले आहे. आयुष्मान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी पडद्यावर झळकणार आहे. नुकताच त्याच्या आगामी ‘ड्रीमगर्ल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे.

आयुष्मानसोबत या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा देखील झळकणार आहे. पण, आयुष्मानच ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते चित्रपटाचा ट्रेलर पाहून अक्षरश: आयुष्मानच्या प्रेमात पडले आहेत. या ट्रेलरवर आत्तापर्यंत ११ मिलीयनपेक्षा जास्त व्ह्युव्ज मिळाले आहेत. तर, या ट्रेलरची वर्णी यूट्यूबच्या टॉप १० ट्रेण्डींग व्हिडिओमध्ये लागली आहे.

आयुष्मानच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरही चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी त्याच्या अभिनयाचेही भरभरुन कौतुक केले आहे. अलिकडेच आयुष्मानला त्याच्या ‘अंधाधून’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला असल्यामुळे तो या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचे चाहत्यांनीही म्हटले आहे.

आयुष्मानने ‘विकी डोनर’, ‘दम लगाके हैशा’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’, यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने तर जिंकली. पण त्याने त्याच्या अभिनयाची झलक ‘आर्टिकल १५’ सारख्या गंभीर विषयावर आधारित असलेल्या चित्रपटातही दाखवून दिली. आता ‘ड्रीमगर्ल’ चित्रपटातून पुन्हा एकदा तो वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment