शरद पवारांच्या आवाहनानंतर अवघ्या तासात पूरग्रस्तांसाठी जमा झाला एक कोटींचा निधी


पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. आपआपल्यापरीने अनेक जण मदत करत आहेत. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्तांसाठी बारामतीकरांना मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून एक कोटींचा निधी केवळ तासाभरात जमा झाला आहे.

शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराबाबत बैठक घेतली. या बैठकीत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बारामतीमधील संस्था, मंडळे, संघटना सहभागी झाल्या होत्या. नागरिक आणि प्रतिनिधींनी माझ्या काही तासांपूर्वीच्या हाकेला प्रतिसाद देत अवघ्या एक तासात सुमारे एक कोटी रुपयांची वर्गणी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अन्य भागातील पूरग्रस्त पीडितांना मदत म्हणून दिली आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

साखर कारखाने, व्यापारी संस्थांनी साखर, धान्य, नवे कपडे, औषधे या गोष्टी देखील देण्याचे जाहीर केले. बारामतीकरांनी कधीही कोणत्याही आपत्ती प्रसंगी संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यास मागेपुढे पाहिले नाही. मला बारामतीकरांचा अभिमान वाटतो. सर्व दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून आभार, असे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

मुसळधार पावसामुळे महापुराने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला वेढा घातला. सध्या दोन्ही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पूर स्थिती जैसे थे आहे. बचाव पथकाचे अनेक गावांमध्ये काम सुरू आहे. प्रत्येकजण कोल्हापूर सांगलीमधील पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी धावून येत आहे. शरद पवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बारामतीकरांना आवाहन केले आणि काही मिनिटातच तब्बल एक कोटी रूपयांचा निधी जमा झाला. पवार यांनी देखील यामध्ये विद्या प्रतिष्ठान संस्थेचेवतीने ५० लाख रुपयांचा निधी देऊन मोठे योगदान दिले.

पवार यांनी सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २५ लाख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ लाख असे एकूण ५० लाख रूपयांची निधी दिली जाणार असल्याची स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. राज्यातील पूर परिस्थितीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Comment