कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असणाऱ्या सुषमा स्वराज करत नसत इतर कोणालाही ‘फॉलो’


परदेशामध्ये काही कारणांस्तव भारतवासीय गेले असले, आणि कुठल्याही अडचणीत सापडले, तर त्यांच्या मदतीच्या हाकेला धावून जाणाऱ्या मंत्री महोदया अशी ओळख, दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी प्राप्त केली होती. इतकेच काय पण जर कोणी मंगळ ग्रहावरही अडकले, तरी भारतीय दूतावास तिथेही मदतीस हजर असेल असा लौकिक सुषमा स्वराज यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संपादन केला होता. असे भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या सुषमा स्वराज यांचा शेवटचा ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडीयावर त्यांचा हा ट्वीट गेले दोन दिवस ‘ट्रेंड’ होत आहे. ट्वीटर द्वारे आपली मते धडाडीने मांडणाऱ्या सुषमा स्वराजना ‘फॉलो’ करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. पण विशेष गोष्ट अशी, की करोडो फॉलोअर्स असणाऱ्या सुषमा स्वराज, स्वतः मात्र कोणालाच ‘फॉलो’ करीत नसत. किंबहुना ट्वीटर वरून कोणालाही फॉलो न करणाऱ्या, सुषमा स्वराज या एकमेव राजनेत्या होत्या असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.

ट्वीटरवर सुषमा स्वराज यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या १.३२ कोटी इतकी आहे, तर त्या ‘फॉलो’ करत असलेल्यांची संख्या शून्य आहे. आपले ट्वीटर हँडल स्वतःच हाताळणाऱ्या सुषमा स्वराज, या माध्यमाद्वारे परदेशी संकटात सापडलेल्या अनेकांच्या मदतीला देवासारख्या धावून गेल्या. परदेशातून भारतामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी येण्याकरिता परदेशी नागरिकांचे अर्ज असोत, किंवा परदेशामध्ये लहान-मोठ्या अडचणीत सापडलेले भारतीय नागरिक असोत, सुषमा स्वराज यांनी कायम तत्परतेने सर्वांच्याच अडचणी दूर केल्या. किंबहुना पाकिस्तानशी भारताचे संबंध कायमच तणावपूर्ण असतानाही तेथिल नागरिकांना भारतामध्ये उपचार करण्यासाठी येता यावे या करिता सुषमा स्वराज विशेष प्रयत्नशील असत. परदेशामध्ये अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांनी पाठविलेल्या केवळ एका ट्वीटवर सुषमा स्वराज यांनी मदतीची व्यवस्था अनेकदा केली आहे.

सुषमा स्वराज यांचे लाखो फॉलोअर्स असूनही त्यांनी आपणहोऊन ट्वीटर वरून कधीच कोणालाही फॉलो केलेले नाही. खुद्द पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटरवर ४.९० कोटी फॉलोअर्स असून, पंतप्रधान स्वतः २२२८ लोकांना फॉलो करतात. तसेच रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अनुक्रमे १.३७ कोटी व १.४६ कोटी फॉलोअर्स असून, राजनाथ सिंह ३१४ लोकांना फॉलो करतात, तर अमित शाह २९२ लोकांना फॉलो करीत असल्याचे समजते. अमेरिकन राष्र्ापती डोनाल्ड ट्रंप यांचे ६.२८ फॉलोअर्स असून ट्रंप स्वतः ४७ लोकांना फॉलो करतात.

Leave a Comment