पाकिस्तानचा तडफडाट आणि पायावर धोंडा


जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारतीय संसदेत रद्दबातल झाल्याने पाकिस्तानचा पुरता जळफळाट झाला आहे. भारतीय नेत्यांनी रचलेल्या चालींना कसे प्रत्युत्तर द्यावे, हे न समजल्याने पाकिस्तानने वाट्टेल ती पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यातून त्याचेच जास्त नुकसान होणार आहे.

कलम 370 रद्द झाल्याने पाकिस्तान आतापर्यंत काश्मिरमध्ये चालवत असलेल्या द्वेषाच्या मोहिमेला खिळ बसली आहे. काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवादाला चिथावणी देण्यात पाकिस्तानी नेत्यांची सगळी हयात खर्ची पडली. त्यासाठी केलेली गुंतवणूक आणि दिलेली किंमत वाया गेल्याच्या वैफल्याने पाकिस्तानी नेतृत्वाला घेरले आहे. शिवाय या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताचीच बाजू उचलून धरली. त्यामुळे तर पाकिस्तानच्या जळफळाटाला सीमाच उरली नाही.

म्हणूनच गोंधळलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठविले आहे. तसेच भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणाही पाकिस्तानच्या वतीने करण्यात आली. याशिवाय हवाई हद्दही 5 सप्टेबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. काश्मिरबाबतच्या भारतीय संसदेच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रातही धाव घेण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. इतकेच नाही तर भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले.

भारताने कलम 370 रद्द केल्यावर पाकिस्तानी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले होते. तेव्हा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग (एन्)’चे नेते शहबाज शरीफ यांनी ‘पाकिस्तानने कठोर प्रतिक्रिया दिली पाहिजे’, असे मत व्यक्त केले. त्यावर इम्रान खान यांनी वरील विधान केले. इम्रान खान तर एवढे वैफल्यग्रस्त झाले, की विरोधी पक्षांची नेमकी काय अपेक्षा आहे? मी पाकिस्तानी सैन्याला भारतावर हल्ला करण्याचा आदेश देऊ का असा प्रश्न त्यांनी विचारला. पुलवामासारखे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याची दर्पोक्तीही केली.

पाकिस्तानी लष्कराला सीमावती भागात सतर्क राहण्याचे आदेशही पाकिस्तान सरकारने दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी वाघा सीमेवरच रोखण्यात आली. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. ‘आमचे गार्ड आणि मोटरमन भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत’, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. दरम्यान, भारताने आपले गार्ड आणि मोटरमन पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली होती. त्यानंतर 4 मार्चला ती पुन्हा सुरू करण्यात आली.

हे सगळे निर्णय आपल्यावरच उलटल्याचे जाणवल्यामुळे पाकिस्तानने वेगळाच मार्ग पत्करला. प्रत्यक्ष रणांगणावर किंवा वास्तव जीवनात भारताला पराभूत करता येणार नाही, हे जाणवल्यावर सोशल मीडियाचा वापर करत भारतीयांना चिथावण्याचे प्रयत्न त्याने सुरू केले. सायबर यंत्रणांनी सोशल मीडियावर नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, ‘मोदी किलिंग काश्मिरीज’ या हॅशटॅगसह दीड लाखांहून अधिक चिथावणीखोर ट्वीट्‌स सापडली आहेत. हे सर्व ट्वीट्स पाकिस्तानच्या विविध भागांतून टप्प्याटप्प्याने करण्यात आल्याचे संशोधनानंतर स्पष्ट झाले.

आतापर्यंत सीमेपलीकडून गोळीबार किंवा सीमेपलीकडून दहशतवाद हे शब्द आपल्या परिचयाचे होते. मात्र सीमेपलीकडून दहा मिनिटांत 358 या वेगाने ट्‌वीट्‌स करण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांना आढळले. हे ट्वीट्स एका क्षणात सुमारे चार लाख ट्वीटर वापरकर्त्यांपर्यंत पोचले. त्यावर 27 हजार ‘रिट्‌वीट’ आले आणि 75 हजार ‘लाइक्स’ प्राप्त झाले. त्यावरुन मूळ ट्वीट (12.5 टक्के) कमी आणि रिट्‌वीटचे प्रमाण अधिक (86 टक्के) असल्याची नोंद झाली. यातील बहुतांश प्रतिक्रिया इस्लामाबाद, कराची, लाहोर, पंजाब प्रांत, सियालकोट, मुलतान, पेशावर या विविध भागांतून आल्या.

वास्तविक त्या देशाचे हे सर्व नसते उद्योग त्याच देशाच्या अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे. बालाकोटमधील हवाई कारवाईनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली. यामुळे भारतीय विमानांना मोठा फेरा मारावा लागेल, त्यामुळे भारताचा खर्च वाढेल आणि भारताचे नुकसान होईल असा त्याचा अंदाज होता. मात्र झाले उलटेच. त्या लांबच्या फेऱ्यामुळे होणारे नुकसान भारत सहन करू शकला. मात्र भिकेला लागलेल्या पाकिस्तानला त्यामुळे झालेले नुकसान भरून काढताना नाकी नऊ येत आहेत. भारताने व्यापारी संबंध आधीच तोडले आहेत, त्यामुळे पाकिस्तानी जनतेचे खाण्या-पिण्याचे कसे हाल होत आहेत, हे साऱ्या जगातील माध्यमे दाखवत आहेत. मात्र आपला पराभव मान्य करण्याची नीयतच त्या देशात नाही. त्यामुळे त्याचे हे उपद्व्याप यापुढेही चालू राहतील, यात शंका नाही.

Leave a Comment