गांधीजींची जीवनशैली अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार


देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जीवनशैली कशी होती ते अनुभवण्याची संधी आता पर्यटकांना मिळणार असून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी असे आश्रमीय जीवन पर्यटक अनुभवू शकणार आहेत. हे आदर्श जीवन जगण्याची संधी सांस्कृतिक मंत्रालय आणि पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने दिली जाणार असून त्यासाठी गांधी थीम होम स्टे ही योजना आखली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही कल्पना पंतप्रधान मोदी यांची असून म.गांधींच्या १५० व्या जयंती कार्यक्रमाच्या बैठकीत ती मांडली गेली होती. त्यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासंदर्भात देशभरात अशी ठिकाणे शोधण्याचे काम सुरु केले आणि आता ते लवकरच पूर्णत्वास जात आहे. गांधी आश्रमात स्वावलंबन, अहिंसा, स्वदेशी वापर, रोजच्या जेवणासाठी कष्ट करणे, आत्मसंयम, शाकाहार यांना प्राधान्य होते. याच जीवनाची ओळख आता पर्यटकांना करून दिली जाणार असून १ आठवड्यासाठी पर्यटक अश्या केंद्रातून गांधीजींच्या जीवनशैलीचा अनुभव स्वतः घेऊ शकणार आहेत. देशभरात यासाठी ५०० अश्या संस्था शोधल्या गेल्या असून तेथे कोणत्या सुविधा आहेत याची माहिती घेतली जात आहे.

येथे येणारे पर्यटक सकाळची प्रार्थना, फेरफटका, बागकाम, स्वयंपाक, सफाई, स्नान, साबणाशिवाय दाढी, चरखा चालविणे, ध्यानधारणा, पत्रलेखन, भजन, ग्रामीण यात्रा, साधे जेवण, खादीचा वापर अशी दिनचर्या अनुभवू शकणार आहेत.

Leave a Comment