पाक क्रिकेटपटूंना यापुढे बिर्याणीचे वावडे


कराची – नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेनंतर संघात अनेक फेरबदल करण्यात येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्या बदलांच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाने पहिला बदल म्हणून, पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसबाबत नियमावली तयार केली आहे. यामध्ये खेळाडूंना यापुढे बिर्याणी खाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्यात मैदानात अनेक वेळा जांभई देताना दिसून आला. सोशल मीडियावर सरफराजचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. पाकिस्तानचा त्या सामन्यात पराभव झाला. त्यानंतर तर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने तर सरफराजचा चांगलाच समाचार घेतला. त्याने असा पोट सुटलेला कर्णधार मी कधी पाहिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

इंग्लंडमध्ये एका पार्टीमध्ये सरफराजसह संघातील अनेक खेळाडू फास्ट फूट खात असतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. संघातील खेळाडू फिटनेसबाबत जागृत नसल्याची टीका माजी खेळाडूंनी केली होती. पीसीबीने या सर्व कारणाने खेळाडूंच्या फिटनेसबाबत जोर देण्यास सुरुवात केली आहे.

स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टची नियुक्ती करण्याचा निर्णय पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी घेतल्यामुळे आता जे आहार खेळाडूंना स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट सांगेल तोच आहार खेळाडूंना घ्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना आता बिर्याणी खायला मिळणार नाही. न्यूट्रिशनिस्टकडून डाळ-भात आणि भाज्यांवर जास्त भर देण्यात येणार आहे.

Leave a Comment