जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या माळशेज घाटातील व्हिडीओ मागील सत्य


मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे दरड कोसळून दुर्घटनांचे प्रमाणही पुणे, नाशिक, कोकण भागात वाढत आहे. यादरम्यान अनेक जण घाटातून प्रवास करताना दरड कोसळल्याचे, डोंगरातून कोसळणार्‍या धबधब्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत.

पण सध्या सोशल माडियावर माळशेज घाटाच्या दरडीचे रौद्ररूपच्या नावाने जम्मू काश्मिर मधील एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. सध्या सोशल मीडियात दरड कोसळत असलेली सुमारे 14 सेकंदाची एक क्लिप झपाट्याने व्हायरल होत आहे. माळशेज घाटातील रस्त्ता वाहतुकीसाठी बंद अशाप्रकारचे मेसेजही या क्लिपसोबत पसरवले जात आहेत. पण यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे.


माळशेज घाटातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असले तरीही मूळचा तो जम्मू काश्मिरमधील आहे. हा व्हिडिओ मूळात जम्मू – श्रीनगर हायवे वरील रामबान येथील असल्यामुळे जम्मूमधील वाहतूक बंद असल्याचे म्हटले आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुण्यातील माळशेज घाटात नयनरम्य दृश्य असते. अनेक रिसॉर्ट्स या भागात आहेत. प्रामुख्याने फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी येथे गर्दी केली जाते. पावसाळ्यात या भागात हमखास पर्यटकांची मोठी गर्दी असते.

पावसाचा जोर मुंबई, ठाणे सह पुण्यातही थांबला आहे. मुंबई – पुणे दरम्यान रखडलेली रेल्वे सेवा देखील आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याआधी माहिती तपासून पहा. तसेच अशाप्रकारचा कोणताही व्हिडिओ आणि मेसेज तुमच्याकडील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वरही आला असेल तर त्याची खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करणे टाळा.

Leave a Comment