कडव्या युद्धाचा गोड निकाल! ओडिशालाही मिळाला स्वतःचा रसगुल्ला


भारताच्या दोन राज्यांमध्ये पेटलेल्या एका कडव्या युद्धाचा गोड निकाल लागला आहे. हे युद्ध पेटले होते रसगुल्ला या मिठाईवरून. रसगुल्ल्यावर दोन्ही राज्यांनी आपला हक्क सांगितला होता. त्यातील एका राज्याला यापूर्वी रसगुल्ल्याची मालकी मिळाली होती. मात्र दुसऱ्या राज्यालाही स्वतःचा रसगुल्ला मिळाला आहे आणि त्यामुळे या दोन शेजाऱ्यांतील कटूता दूर व्हायला हरकत नसावी.

रसगुल्ला माहीत नाही, असा मिठाईप्रेमीच वेगळा! या पदार्थाचे नुसते नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. पाकात पूर्णपणे भिजवलेला पांढरा, गोल गुबगुबीत रसगुल्ला तोंडात टाकल्यावर तत्काळ विरघळतो. मात्र याच गोंडस पदार्थावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही दोन राज्ये समोरासमोर उभी टाकली होती. या दीर्घ मिठाईयुद्धाला सोमवारी पूर्णविराम मिळाला.

ओडिशातील रसगुल्ल्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देण्याचा निर्णय चेन्नईतील जीआय रजिस्ट्रीने सोमवारी जाहीर केला. हा रसगुल्लाआता ‘ओडिशा रसगोला’ म्हणून ओळखला जाईल. ‘ओडिशा रसागोला’ चे औपचारिक प्रमाणपत्र ही यावेळी अधिकाऱ्यांनी ओडिशाच्या अधिकाऱ्यांना बहाल केले. जीआय टॅगमुळे नोंदणीकृत आणि अधिकृत वापरकर्त्यालाच संबंधित उत्पादनाच्या नावाचा वापर करता येतो.

ओडिशा सरकारने 2015 पासून “उल्टो रथ’ महोत्सवात रसगुल्ला दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन शेजारी राज्यांमध्ये छोट्याशा रसगुल्ल्यावरून भांडण लागले होते. रसगुल्ला ही मिठाई बंगाली असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र हा पदार्थ ओडिशात जन्मल्याचा त्या राज्याचा दावा होता. अगदी राज्य विधानसभेतही या रसगुल्ल्यावरून गरमागरम चर्चा झाली होती. नंतर दोन्ही राज्यांनी यावर कायदेशीर लढाईही लढली आणि अखेर जीआय रजिस्ट्रारनी नोव्हेंबर 2017 मध्ये प. बंगालला त्याच्या रसगुल्ल्यासाठी जीआय टॅग दिला होता. त्यावेळी रसगुल्ल्याची उत्पत्ती पश्चिम बंगालमध्ये झाली, असे चुकीने मानले गेले. मात्र आता ओडिशालाही हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे चव आणि पोत वेगवेगळे असलेल्या दोन प्रकारच्या दोन वेगळ्या जातींच्या रसगुल्ल्याला मान्यता मिळाली आहे.

बंगाली लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, रसगुल्ल्याचा शोध नोबिनचंद्र दास यांनी कोलकात्यातील बागबाजार येथील आपल्या निवासस्थानी लावला होता. मात्र ओडिशाच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, राज्यातील निलाद्री बिजे येथे अनेक शतकांपासून रसगुल्ला प्रसाद म्हणून दिला जातो. या मंदिराची सध्याची रचना तयार झाली तेव्हापासून म्हणजे 12 व्या शतकापासूनची ही पुरातन परंपरा असल्याचे ओडिशाच्या जनतेचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या या दाव्याला पुष्टी देण्यासाठी लेखी पुरावे फारसे उपलब्ध नाहीत.

एक वेळ तर ओडिशा सरकारनेसुद्धा जाहीर केले की या उद्देशाने स्थापन केलेली समिती कोणतेही पुरावे गोळा करण्यात अपयशी ठरली आहे. मात्र ओडिया संस्कृतीचे अभ्यासक असित मोहंती यांनी आपली चिकाटी सोडली नाही. त्यांनी आपल्या परिश्रमपूर्वक संशोधनातून रसगुल्लाविषयी अनेक अज्ञात तथ्ये समोर आणली.

मोहन्ती यांना 15व्या शतकातील ओडिया दंडी रामायण या ग्रंथात रसगोला हा शब्द सापडला. प्रसिद्ध मध्ययुगीन कवी बलराम दास यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. उत्तर भारतात जवळपास प्रत्येकाच्या तोंडी असलेले राम चरितमानस तुलसी दासांनी 16व्या शतकात लिहिले. त्यापूर्वीच बलराम दासांनी हे महाकाव्य लिहिले होते. मोहंती यांनी अनेक ओडिया आणि संस्कृत ग्रंथांची उदाहरणे देऊन सिद्ध केले, की फ्रेंच आणि पोर्तुगीज भारतात येण्यापूर्वीही छेना ( कॉटेज चीज) हा पदार्थ भारतीयांना माहीत होती.

त्यांच्या प्रयत्नातून ओडिशा स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडने जीआय रजिस्ट्रारकडे आपले म्हणणे सादर केले. ओडिशा रसागोला हा स्पर्शाला अत्यंत मुलायम, रसदार असतो आणि दातांचा दबाव न आणता थेट गिळता येतो. अन्य ठिकाणी तयार केलेला रसगुल्ला किंवा रसोगोला गोलाकार, रंगाने शुभ्र पांढरा आणि साधारणतः स्पंजासारखा असतो, असे संस्थेने दाखवून दिले.

या नव्या मान्यतेमुळे प. बंगाल आणि ओडिशात निर्माण झालेली कटूता दूर होण्यास मदत होईल. मात्र आता रसगुल्ला खाणाऱ्यांसमोर एक नवीच समस्या उभी राहिली आहे. आपण प. बंगालचा रसगुल्ला खाल्ला का ओडिशाचा हे जाणून घेणे आता महत्त्वाचे झाले आहे. त्यावरून पुन्हा कुठला वाद निर्माण होऊ नये म्हणजे मिळवली.

Leave a Comment