सायप्रसचे बिशप यांचा अजब दावा; पालकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात समलैंगिक


एलजीबीटी लोकांना एक ओळख देऊन ऐतिहासिक पाऊल भारतात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने उचलले. भारतात समलैंगिक विषयावर गेल्या काही वर्षांपासून भाष्य केले जात आहे. पण जगभरात असे अनेक देश आहेत जिथे समलैंगिकता हा गुन्हा मानला जातो. या मुद्यावर जगात अनेक चळवळी आणि प्रदर्शने होत असतात. अशात एका बिशपने यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनैसर्गिक शारीरिक संबंध गरोदर महिलेने ठेवल्यावर समलैंगिक मुले जन्माला येतात, असे म्हटले आहे.

चर्च ऑफ सायप्रसच्या या बिशपचे नाव बिशप निओफिटोस मसूरस ऑफ मॉर्फो असे आहे. सायप्रसच्या अकाकी येथील प्राथमिक शाळेत बोलताना जून महिन्यात त्यांनी हे वक्तव्य केले होते. सायप्रस मेलच्या म्हणण्यानुसार, या ग्रीक ऑर्थोडॉक्स धार्मिक नेत्याने असा दावा केला की, समलैंगिकता ही एक समस्या असून पालकांद्वारे जी सहसा मुलाकडे संक्रमित केली जाते. बिशप याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले, अनैसर्गिक सेक्स पालकांनी केला असेल किंवा गरोदरपणात अनैसर्गिक सेक्स घडला असेल तर मुलांच्या मनातही तशीच आवड निर्माण होते.

सोशल मीडियावर या बिशपचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या या खुळचट विचारांचा अनेकांनी खरपूस समाचार घेतला. काहींनी समलैंगिक मुले अशा प्रकारे जन्माला येत असतील, तर मग लेस्बियन कशा जन्माला येतात? असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान सायप्रस देशात 2004 मध्ये सेक्शुअल ओरिएन्टेशनमुळे भेदभाव करण्यावर बंदी घातली आहे. समलैंगिक लोकांना 2015 मध्ये लग्नाचाही अधिकार देण्यात आला आहे. अजूनही बुरसटलेले धर्म प्रवर्तक अशा पुढारलेल्या देशात राहतात आणि इतर लोक त्यांना फॉलो करतात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment