‘बाटला हाऊस’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकुर ही देखील स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांनी या ट्रेलरवर भरभरुन प्रतिक्रिया देखील दिल्या. या चित्रपटात आता जॉन आणि मृणालवर चित्रीत असलेले नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘बाटला हाऊस एनकाउंटर’वर आधारित हा चित्रपट आहे. जॉन आणि मृणाल यांच्यातील नातेसंबध नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यात उलगडण्यात आले आहेत. दोघेही या चित्रपटात पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका जॉन साकारत आहे. त्यामुळे त्याच्या नोकरीमुळे त्यांच्या नात्यात कशाप्रकारे दुरावा निर्माण होतो, हे गाण्यात पाहायला मिळते. हे गाणे अंकित तिवारी आणि ध्वनी भानुशाली यांनी गायले आहे. या गाण्याचे एक पोस्टर शेअर करुन जॉनने ‘प्यार के रास्तो पर फर्ज निभाना आसान नही, असे कॅप्शन दिले आहे.


दिल्लीच्या जामिया नगर येथील एल-१८ बाटला हाऊसमध्ये २००८ साली एक एनकाउंटर झाले होते. मुजाहिदीनचे दोन दहशतवाद्यांना यामध्ये ठार करण्यात आले होते. हे एनकाउंटर पुढे खोटे असल्याचे सांगत याबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. जॉन हा पोलीस अधिकारी संजीव कुमार यांची भूमिका या चित्रपटात साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांनी केली आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment