भिक मागणाऱ्या दिव्यांग तरुणाला नितीन नांदगावकरांची खास भेट


सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नांदगावकर यांच्या हस्ते एका तरुणाला दिव्यांगांची सायकल भेट देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. नांदगावकर यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओनुसार ही सायकल माहिमच्या दर्ग्याजवळ भीक मागणाऱ्या तरुणाला स्वावलंबी बनवण्यासाठी भेट देण्यात आल्याचे म्हटले आहे.

फुग्यांनी सजवलेली दिव्यांगांची सायकल सचीन नावाच्या तरुणाला भेट देताना आपल्या रोख-ठोक भुमिकेसाठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारे नांदगावकर हे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. नांदगावकर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘मै सिर्फ जरिया हूँ देने वाले हजारो हात है’ असे म्हटले आहे. ही सायकल नांदगावकर यांनी दिली नसून नांदगावकर व्हिडिओत ती दुसऱ्या एका व्यक्तीने दिली असल्याचे सांगतात.

माहिमच्या दर्ग्याजवळ या व्हिडिओत दिसणारा सचीन हा दिव्यांग तरुण भीक मागायचा. दोन्ही पाय ट्रेन अपघातामध्ये गमावल्याने त्याला भिक मागून पोट भरावे लागत होते. नांदगावकर यांना ही गोष्ट समजल्यानंतर या मुलासाठी त्यांनी सायकल दान करण्यासंदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. शंभरहून अधिक लोकांनी सचिनला सायकल देण्याची तयारी दाखवली. अखेर लकी ड्रॉच्या माध्यमातून अमय तावडे या वसईतील मुलाची निवड करुन त्याने दिलेली सायकल नांदगावकर यांनी स्वत:च्या हस्ते सचिनला दिली. ज्यांची मेहनत करण्याची तयारी असते त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई आहे. तुला म्हणूनच सायकल देण्यासाठी मला शंभरहून अधिक मेसेजेस आले, असे नांदगावकर यांनी सचिनला सांगितले.

जर मला तू या पुढे भीक मागताना दिसला तर या सायकलचा उपयोग झाला नाही असे समजेल. तुला भीक मागूनच पैसा कमावायचा असेल तर ते तुझ्यावर, असं नांदगावकर म्हणताच या सायकलच्या मदतीने काहीतरी विक्री करुन पैसे कमावणार असल्याचे सचिनने सांगितले. आपण या पुढे भिक मागणार नसून भाजी विकण्याची आपली इच्छा असल्याची नांदगावकर यांना सचिनने सांगितले. त्यासाठीही नांदगावकर यांनीही सायकलमध्ये बदल करुन एक स्टॅण्ड लावून देण्याचे आश्वासन दिले. दिव्यामध्ये राहणाऱ्या सचिनला दिव्यात येऊन स्टॉल उभारणीसाठी आपण नक्की मदत करु असेही नांदगावकर यांनी सचिन आणि त्याच्या आईला सांगितले. नांदगावकर यांना ही सायकलही चालवून सचिन याने दाखवल्याचे या व्हिडिओत दिसते.

Leave a Comment