कसोटी क्रिकेटमधून पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरची निवृत्ती


लाहोर : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज 27 वर्षीय मोहम्मद आमीरने तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. पण तो वन डे क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.

आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केली. पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने आमीरने खेळले आहेत. त्याने यामध्ये तब्बल 119 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमधील धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेल्या आमीरने 59 वन डे सामन्यात 77 विकेट्स आपल्या नावावर जमा केल्या आहेत.

2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आमीरने पदार्पण केले होते. पण मॅचफिक्सिंगमध्ये दोषी आढळून त्याची रवानगी जेलमध्ये झाली होती. त्यानंतर आमीरने 2016 मध्ये पुन्हा कसोटी क्रिकेटमधूनच पुनरागमन केले होते. आमीरला पुनरागमनानंतर कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यात यश आले नाही. त्या तुलनेत वन डे आणि टी 20 क्रिकेटमध्ये आमीरने जबरदस्त गोलंदाजी केली.

Leave a Comment