हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज


बॉलिवूडचा रॉकस्टार अर्थात अभिनेता-गायक-संगीतकार-निर्माता-दिग्दर्शक हिमेश रेशमियाने आत्तापर्यंत दोन-तीन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. पण त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण तो आता पुन्हा एकदा पंजाबी कथेवर आधारित असलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’, असे आहे. हिमेशसोबत या चित्रपटात पंजाबी अभिनेत्री सोनिया मान ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. तर, चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.

हिमेश आणि सोनिया मान यांची झलक या चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळते. हिमेशनेच यामधील गाणी गायली आहेत. तर, एक गाणे अरिजीत सिंगच्या आवाजातही असणार आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याच्या आवाजाची जादु अनुभवायला मिळणार आहे. अरिजीत आणि हिमेश यांच्या आवाजातील गाण्यांसाठी चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राका यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा ही त्रिकोणी प्रेमकथा असल्याचा अंदाज चित्रपटाच्या टीझरवरुन येतो. तसेच, या चित्रपटामध्ये हिमेशची दुहेरी भूमिका असणार आहे. तसेच या चित्रपटात ८ गाण्यांचा समावेश राहणार आहे. ही गाणी हिमेशसोबत अरिजीत सिंग, श्रेया घोषाल आणि जुबीन नौटीयाल यांच्या आवाजातील असणार आहेत.

Leave a Comment