रिव्ह्यू घेणे एकट्या धोनीचे काम नाही – रोहित शर्मा


बर्मिंघम : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला असून यजमान इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जेसन रॉयच्या ग्लोव्हजला लागलेल्या चेंडूचा महेंद्र सिंह धोनीने झेल घेतला. पण पंचांनी जेसन रॉयच्या बाजूने कौल दिला. यानंतर रिव्ह्यू घेण्याबद्दल पांड्या आणि कोहलीने धोनीला विचारले, पण रिव्ह्यू घेण्याबाबत धोनी फारसा उत्सुक नसल्यामुळे टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला नाही. पण रिप्लेमध्ये बघितले असता रॉयच्या ग्लोव्हजला चेंडू लागल्याचे स्पष्ट दिसत होते.

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माला पत्रकार परिषदेत जेसन रॉयचा रिव्ह्यू न घेण्याबाबत विचारण्यात आले. विरोधी टीमच्या खेळाडूला नॉट आऊट दिल्यानंतर रिव्ह्यू घेणे फक्त एकट्या धोनीचे काम नसून यात दुसऱ्या खेळाडूंची भूमिकाही महत्त्वाची असते, असे रोहित म्हणाला. रिव्ह्यू घेणे ही गोष्ट फार क्लिष्ट आहे. तुम्ही प्रत्येकवेळी योग्य असाल असे होत नाही. आवाज काही खेळाडूंनी ऐकला तर काहींनी ऐकला नाही. कर्णधार दबावात होता. धोनीचा निर्णय प्रत्येकवेळी योग्य येईल ही अपेक्षा करणे योग्य नाही. कारण त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. तुमच्या बाजूने जेव्हा निर्णय जातो तेव्हा तुम्ही भाग्यवान असता. गोलंदाज अनेकवेळा उत्साहित होतात आणि रिव्ह्यू घ्यायला सांगतात. अनेकवेळा चेंडू लाईनच्या बाहेर आहे याकडेही त्यांचे लक्ष नसते, असं वक्तव्य रोहितने केले.

Leave a Comment