विश्वचषक स्पर्धेतून विजय शंकर बाहेर


नवी दिल्ली – भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेदरम्यान अजून एक धक्का बसला असून दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू विजय शंकर संघातून बाहेर पडला आहे. या स्पर्धेतून सर्वातआधी शिखर धवन आणि त्यानंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवालला बोलवण्यात आले असल्याची माहिती आहे. विजय शंकरच्या पायाला नेट प्रॅक्टिस दरम्यान जसप्रीत बुमरहाचा बॉल लागला होता. ही दुखापत सुरुवातीला गंभीर नसल्याचे सांगत विजय शंकर पुनरागमन करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण ही दुखापत आता गंभीर असून विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे.

विजय शंकरच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी आयसीसीकडे बीसीसीआयने औपचारिक विनंती केली आहे. पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहचा बॉल विजय शंकर याच्या घोट्याला लागला आहे. त्याची दुखापत गंभीर असून तो विश्चचषक स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाही. त्याला पुन्हा घरी पाठवण्यात येत असल्याची माहिती एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.

मयांक अग्रवालला भारतीय संघ व्यवस्थापन संधी देण्याची शक्यता आहे. मयांक अग्रवाल ओपनिंग फलंदाज असल्याने तो के एल राहुलची जागा घेऊ शकतो. पुढील दोन सामन्यांमध्ये जर ऋषभ पंत चांगली खेळी करु शकला नाही तर के एल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment