
जामनगर – गुजरातमध्ये १९९० साली झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत माजी आयपीएस संजीव भट्ट यांना दोषी ठरवत त्यांना गुजरातमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजीव भट्ट यांचे सहकारी डी. एन व्यास यांनाही न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणातील अन्य दोषी पोलिसांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
माजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा
१९९० साली गुजरातमधील जामनगर येथे संजीव भट्ट अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जोधपूर कसब्यांमध्ये झालेल्या जातीयवादी हिंसाचारानंतर १५० जणांना ताब्यात घेतले होते. प्रभुदास वैशनानी याचाही यामध्ये समावेश होता. त्याच्यावर सुटकेनंतर रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. भट्ट आणि अन्य ६ पोलिसांविरोधात वैशनानीच्या भावाने तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत पोलिसांच्या मारहाणीत भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.
