जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या परिचारकचे निलंबन मागे


मुंबई – विधानपरिषदेत देशाचे सीमेवर संरक्षण करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आले. याविषयीची माहिती सभागृहात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची माहिती सभापतींकडून दिली जात असताना सभागृहात शिसवेनेचे नेते अनिल परब यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. पण एकाही सदस्यांनी याला विरोध केला नाही.

सभापती आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मी यापूर्वीच सभागृहात त्याची माहिती दिली असून आता यावर कोणीही काही बोलू नये, असे आदेश सभापतींनी दिले. पण याबद्दल काँग्रेसकडून विरोधातील आपली भूमिका आजही कायम असल्याचे काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांना भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विधानपरिषदेतून 9 मार्च 2017 रोजी निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांना विधानभवन परिसरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली होती. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यावर मोठा गदारोळ झाला हेाता.

दरम्यान, परिचारकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशन काळात अनेकदा केली होती. पण, विरोधकांनी प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याला सातत्याने विरोध केला होता. निलंबनास शिवसेना सत्तेत असतानाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी विरोध करत अनेकदा सभागृह दणाणून सोडले होते. पण सेनेच्या एकाही सदस्यांनी सभापतींनी निर्णय दिल्यानंतर याला विरोध दर्शविला नाही.

Leave a Comment