या संघाच्या विरोधात भगव्या जर्सीत उतरणार टीम इंडिया ?


लंडन : सध्या वेल्स आणि इंग्लंडमध्ये आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. भारतीय संघ यामध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत अपराजीत ठरला आहे. आतापर्यंत भारताने चार सामने खेळले असून आहेत. भारताने त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर येत्या 22 जूनला आता भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. भारतीय संघ या सामन्यात निळ्याऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

विराटची टीम इंडिया ज्याप्रकारे खेळत आहे, ते बघून प्लेइंग इलेव्हनमध्ये तो बदल करणार नाही हे मात्र नक्की. पण भारतीय संघात अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यात एक बदल होऊ शकतो. भारतीय संघ यावेळी निळ्या नाही तर भगव्या रंगात दिसू शकतात. याचे कारण म्हणजे अफगाणिस्तानच्या जर्सीचा रंगही निळा आहे.

यंदाच्या विश्वचषकात 10 पैकी चार संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. अफगाणिस्तानच्या जर्सीचा रंग निळा असल्याने भारत 22 जूनला मैदानात भगव्या रंगाच्या जर्सीत उतरु शकतो. मागील बाजूने ही जर्सी भगव्या रंगाची असेल.

आजवर कधीही मेन इन ब्लूच्या नावाने जगभर प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय संघाने निळ्या रंगाचा त्याग केलेला नाही. पण, यंदाच्या विश्वचषकात चार संघांच्या जर्सी या निळ्या रंगाच्या असल्याने भारताला जर्सीच्या रंगात बदल करावा लागत आहे. निळ्या रंगानंतर हिरव्या रंगाच्या जर्सीत पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका हे तीन देश खेळतात. तर न्यूझीलंडची जर्सी काळ्या रंगाची, ऑस्ट्रेलियाची पिवळ्या रंगाची आणि वेस्ट इंडीजची मरुन रंगाची आहे.

Leave a Comment