युवराज सिंहचा विक्रम शाकिब अल हसनने मोडला


लंडन – बांगलादेशने आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील २३व्या सामन्यात वेस्ट इंडिजला धक्का देत विजय मिळवला आहे. शाकिब अल हसनने या सामन्यात धावांचा पाठलाग करताना १२४ धावा करत शानदार शतक झळकावले. भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंहचा एक विक्रम बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकिबने मोडीत काढला आहे.

या सामन्यात खेळताना शाकिबने एकदिवसीय क्रिकेटमधील ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याला हा टप्पा गाठण्यासाठी १९० डाव खेळावे लागले. वीरेंद्र सेहवाग व शिवनारायण चंद्रपॉल यांच्या कामगिरीशी त्याने बरोबरी केली. शिवाय, शाकिबने युवराज सिंह आणि संगकाराचा विक्रम मोडीत काढला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने ४२ व्या षटकामध्ये ३ गड्याच्या मोबदल्यात मिळवले. बांगलादेशकडून शाकिबने १२४ तर लिटन दासने केली ९४ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Leave a Comment