अशी आहे भारताची गुप्तचर संस्था रॉ


गुप्तहेराचे आयुष्य नेहमीच रोमांचक वाटते आणि हिंदी इंग्लिश सिनेमातून ते ज्या पद्धतीने दाखविले जाते त्यामुळे गुप्तहेर हे नेहमीच चर्चेत राहतात. अर्थात सिनेमात दिसणारे गुप्तहेर आणि प्रत्यक्षात हे काम करणारे एजंट यात जमीन अस्मानाचा फरक असतो. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालीसीस विंग म्हणजे रॉ हे असेच एक कोडे आहे. मुळात रॉचा कायदेशीर दर्जा स्पष्ट नाही म्हणजे ती एजन्सी आहे कि एखाद्या एजन्सीचा छोटा विभाग आहे हेच स्पष्ट नाही. त्यामुळे रॉ मध्ये रुजू असलेले अधिकारी आणि हेर हे न उलगडलेले कोडे असावे तसे वाटतात.

रॉ विषयी फार माहिती कधी प्रसिद्ध केली जात नाही. १९६२ चे चीन भारत युद्ध, त्यानंतरचे १९६५ चे भारत पाक युध्द झाल्यावर गुप्तचर यंत्रणांचा कमजोरपण लक्षात आला आणि त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशाच्या अधिक सुरक्षेची गरज जाणवली. त्यातून रॉचा जन्म झाला असे मानतात. रॉची सुरवात २१ सप्टेंबर १९६८ ला झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते रामेश्वर नाथ काव. यात इंटेलिजन्स ब्युरो, आयपीएस अधिकारी, इंडिअन मिलिटरी मधील अधिकारी, रेवेन्यु विभागातील अधिकारी तात्पुरत्या नियुक्तीवर येतात इतकेच सांगितले जाते.


रॉ संबंधी कोणतीच माहिती कधीच दिली जात नाही इतकेच नाही तर माहिती अधिकार हक्क मधून सुद्धा रॉची माहिती मिळविता येत नाही. कारण ही बाब देशाच्या सुरक्षेशी निगडीत मानली जाते. रॉ मध्ये रुजू होणारया व्यक्तीचे आईवडील भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे. रॉचे ब्रीद वाक्य धर्म रक्षति रक्षित: म्हणजे जो धर्माचे रक्षण करतो तो नेहमीच सुरक्षित राहतो असे आहे. अर्थात येथे धर्म म्हणजे देश असा अर्थ अभिप्रेत आहे. रॉ थेट पंतप्रधानाना रिपोर्ट करते. रॉच्या अध्यक्षाची निवड सेक्रेटरी रिसर्च तर्फे होते.

रक्षा विभागातून कुणी रॉ मध्ये सामील होणार असेल तर त्याला मूळ विभागाचा राजीनामा द्यावा लागतो. मिशन पूर्ण झाल्यावर इच्छा असेल तर तो अधिकारी मूळ विभागात परतू शकतो. आपण रॉ साठी काम करतो हे या अधिकार्यांना कुणालाही सांगता येत नाही. एखाद्या कामगिरीवर जाताना त्यांच्या घरांच्या व्यक्ती, पत्नी यानाही त्याची माहिती नसते. २४ तास, सात दिवस कोणत्याची परिस्थितीत काम करण्याची त्यांची तयारी असते. खेळात चांगले प्राविण्य, चीनी अफगाणी तसेच अन्य परदेशी भाषा अवगत असणे, रॉ साठी निवड करताना महत्वाची ठरतात. रॉच त्यांना हव्या असलेल्या लोकांपर्यंत स्वतः पोहोचते, तुम्ही त्यांचा शोध घेण्याची गरज नसते.


यात निवड झालेल्या एजंटना कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यांना शस्त्रे वापरण्याचे ट्रेनिंग दिले गेले असले तरी हे लोक प्रत्यक्ष शस्त्र वापरत नाहीत. त्यांच्यावर बचाव करण्याची वेळ आली तर बुद्धीचा वापर करूनच सुटका करून घ्यावी लागते. या लोकांना अमेरिका, युरोप आणि इस्रायल मध्ये प्रशिक्षण दिले जाते. रॉचा एजंट दुसऱ्या देशात पकडला गेला तर सरकार हात वर करते आणि त्याची कोणतीही जबाबदारी घेत नाही. तेथेच त्याला मृत्यू आला तर मायदेशाची मातीही त्याच्या नशिबी येत नाही. रॉ एजंटची रहस्ये त्यांच्या मृत्युबारोबारचा दफन होतात.

आजकाल विद्यापीठातून सुद्धा रॉ मध्ये काम करण्यासाठी अधिकारी निवडले जातात. ज्यांना रॉ मध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी युपीएससी पास करून आयएफएस मध्ये सामील झाले तर ही शक्यता अधिक वाढते.

Leave a Comment