उद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी


मुंबई – उद्या सकाळी ११ वाजता राज्याच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्यामुळे कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी मंत्रिमंडळ विस्तारात लागणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नवनिर्वाचित मंत्री रविवारी शपथविधीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच झालेल्या खरिप हंगाम बैठकीच्या पत्रकार परिषदेत स्वत: त्याबाबत स्पष्ट संकेतही दिले होते. त्यानंतर १४ जूनला विस्तार होणार असे सांगितले जात होते, मात्र तरीही विस्ताराचे घोंगडे भिजत पडले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी काल रात्री स्वत:च ट्विटद्वारे आपण विस्ताराबाबत उद्‌धव ठाकरे यांना भेटल्याचे ट्विट केले आणि विस्तार होणार हे नक्की झाले.

विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना हटविले जाणार असून त्यात घोटाळ्याचा आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचे नाव अग्रेसर आहे. याशिवाय बबनराव लोणीकर, विष्णू सवरा, प्रवीण पोटे यांच्यासह काहींना डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती दिली होती. त्यांनी याबाबतट्विट देखील केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आज दिल्लीत जाणार असून, अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान शिवसेनेला १ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, अंतर्गत वाद नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारल्याचे समजत आहे.

Leave a Comment