हार्दिक पांड्यामध्ये स्टीव्ह वॉला दिसते या खेळाडूची झलक


लंडन – क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात २७ चेंडूत ४८ धावांची वादळी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉने त्याच्या या खेळीनंतर त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लान्स क्लुसनरशी केली आहे.

हार्दिकच्या खेळीबाबत स्टीव वॉ म्हणतो की, क्लुसनरसारखी हार्दिकची फलंदाजी आणि गोलंदाजीची शैली आहे. हार्दिकच्या वादळी फलंदाजीचा सामना कसा करावा, याचे उत्तर विरोधी संघातील गोलंदाजांकडे नसून तो या स्पर्धेत सर्वांवर भारी पडेल. वॉ पुढे म्हणाला, १९९९ साली चमकणाऱ्या क्लुसनरसारखा हा मुलगा आहे. या मुलाकडे फलंदाजीची अशी शैली आहे, ज्याची तोड विरोधी संघातील कर्णधारांकडे नाही.

हार्दिकने यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्येही त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर साऱ्यांचीच मने जिंकली होती. आयपीएल २०१९ मध्ये त्याने १६ सामन्यांमध्ये १५ डाव खेळताना ४०२ धावा केल्या होत्या. त्यात कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या एका सामन्यात ३४ चेंडूत ९१ धावांची वादळी खेळीचाही समावेश होता.

Leave a Comment