तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘वेलकम होम’चा ट्रेलर रिलीज


आपल्या पैकी प्रत्येक व्यक्तिचे आपले हक्काचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. मग ते लहान असो अथवा मोठे असो, आपल्या कल्पकतेने प्रत्येकजण आपले घर सजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण फक्त चार भिंती बांधल्या म्हणजे घर तयार होते असे नाही. कारण घराला घरपण हे त्यात असलेल्या माणसांमुळे येते. याच विषयावर आधारित एक चित्रपट तुमच्या भेटील येत आहे. त्या चित्रपटाचे नाव वेलकम होम असे असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्या भेटीला आला आहे. घर म्हणजे नेमके काय, हे सांगण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसह तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत, हे कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे आत्तापर्यंत बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, ‘वेलकम होम’ या चित्रपटातून त्यांनी घरात राहणाऱ्या व्यक्तींचे नातेसंबध उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी ‘वेलकम होम’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment