अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार झाला इसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या


नवी दिल्ली – महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा केरळ मॉड्यूलचा म्होरक्या राशीद अब्दुल्ला ठार झाल्याची माहिती आहे. ही माहिती इसिसच्या एका अज्ञात दहशतवाद्याने अफगाणिस्तानच्या खोरासन प्रांतातून टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात दिली आहे. राशीद अब्दुल्लाचा अमेरिकन सैन्याच्या बॉम्ब हल्ल्यात खात्मा झाला. या दहशतवाद्याने संदेशात तीन भारतीय पुरुष, दोन महिला आणि चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

राशीद अब्दुल्ला इसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर सक्रिय होता. मागच्या दोन महिन्यांपासून केरळच्या कासारागॉड जिल्ह्यात रहाणाऱ्या राशीद अब्दुल्लाच्या टेलिग्राम अकाऊंट अपडेट नसल्यामुळे त्याचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी संदेश पाठवला. तो आता जिवंत नसल्याचे त्यावर उत्तर मिळाले. ही माहिती देणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याने स्वत:ची ओळख सांगितलेली नाही.

मे ते जून २०१६ दरम्यान केरळमधून २१ जण इसिसमध्ये सहभागी झाले होते. इसिसचे अफगाणिस्तानातील वर्चस्व असलेल्या भागात हे सर्वजण गेले होते. या २१ जणांचा राशीद अब्दुल्ला नेता होता. त्याची पत्नी आयेशा सुद्धा अब्दुल्ला सोबत गेली होती. हे सर्वजण अफगाणिस्तानात भारतातून यूएई तिथून तेहरानमार्गे पोहोचले होते. पीस इंटरनॅशनल शाळेचा कर्मचारी असणारा अब्दुल्ला २०१४ साली इसिसच्या विचारधारेकडे आकर्षित झाला.

Leave a Comment