केआरकेच्या ‘त्या’ ट्विटला जावेद जाफरीने दिले सडेतोड उत्तर


लवकरच ‘मलाल’ चित्रपटातून बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी हा बॉलिवूड पदार्पण करत आहे. शर्मिन सेहगल हीदेखील त्याच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘मलाल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. चाहत्यांच्या या ट्रेलरवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पण, अभिनेता कमाल आर. खान याने हा ट्रेलर पाहून अशी काही प्रतिक्रिया दिली, की ती वाचुन जावेद जाफरी खवळला आहे.

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कमाल खान म्हणजे केआरके नेहमीच चर्चेत असतो. मिजान आणि शर्मिनबद्दल देखील त्याने वादग्रस्त ट्विट केले. घराणेशाहीच्या चित्रपट निर्माते एवढ्या आहारी गेले आहेत, की ते कोणताही अभिनय न येणाऱ्या स्टारकिड्सला चित्रपटात संधी देतात. जर ते कोणतेही गुण आणि भयानक दिसणाऱ्या कलाकारांना लॉन्च करत असतील तर हा गुन्हा आहे. प्रेक्षकही अशा कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च करणार नाहीत. त्यामुळे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना यापूढेही मूर्ख बनवले जाऊ शकते, असे जर बॉलिवूडला वाटत असेल, तर त्यांनी असा विचार करणे बंद करावे, असे केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

जावेद जाफरीने केआरकेचे हे ट्विट वाचून लगेच यावर आपले सडेतोड उत्तर दिले. असे ट्विट करणारा एक निराश आणि अपयशीच कलाकार असू शकतो. काही अशा कलाकारांची मी नावे देतो, जे घराणेशाहीतूनच सुपरस्टार झाले आहेत. आमिर खान, सलमान खान, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, सनी देओल, सैफ अली खान, ऋषी कपूर, करिश्मा कपूर, करिना कपूर, काजोल, रवीना टंडन आणि आणखी बरेच. प्रेक्षकांना हे देखील मुर्ख बनवत आहेत का?’ असे जावेद जाफरी यांनी लिहिले आहे.

त्यांनी पुढे आणखी एक ट्विट करुन लिहिले की प्रचंड स्पर्धा आणि पैशांचा प्रश्न जिथे आहे, कुठलाही निर्माता तिथे हॉरीबल, डफर कलाकारांवर पैसा लावणार नाही. इंडस्ट्रीत असलेल्या ओळखीच्या भरवशावर केवळ इंटरव्ह्यूपर्यंत पोहचता येऊ शकते. पण ते टॅलेंटच नंतर कामात येते. शेवटी प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना दिवसरात्र कष्ट करावे लागतात, असेही जावेद जाफरीने कमाल खानला सुनावले.

Leave a Comment