अॅपलच्या आयट्यूनसचा 18 वर्षांचा प्रवास थांबणार


अॅपल कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) आणि सह-संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांनी 9 जानेवारी 2001 मध्ये आयट्यूनस (iTunes) सॉफ्टवेअर लाँच केले होते. हे सॉफ्टवेअर म्युझिकच्या दुनियेत क्रांती आणणारे ठरले. 21 व्या शतकात लोकांपर्यंत डिजिटल म्युजिक पोहोचवणे या सॉफ्टवेअरद्वारे सहज शक्य झाले. आता आयट्यूनसचा 18 वर्षांचा हा प्रवास संपण्याची शक्यता असून इतर माध्यमांतील वृत्तानुसार हे अॅप कंपनी लवकरच बंद करण्याच्या विचारात आहे.

या संदर्भात ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार आयफोन, मॅक आणि आय पॅडचे उत्पादन करणारी अॅपल कंपनी त्यांचे आयट्यूनस हे अॅप बंद करण्याची घोषणा डेव्हलपर कॉन्फरंसमध्ये करेल. या कॉन्फरंसला 3 जून अर्थात आजपासून सुरूवात होत आहे. आयट्यूनसची म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पायरसी रोखण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जगभरातील म्युझिक इंडस्ट्रीला याचा फायदा झाला.

आयट्यूनस बंद करण्याचा कंपनीचा निर्णय आश्चर्यकारक नसून याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होतच होती. कारण, अनेक प्रकारच्या सब्सक्रिप्शन बेस्ड म्युझिक स्ट्रीमिंग सर्विस आता जगभरात उपलब्ध आहेत, कंपनीच्या अॅपल म्युझिक या अॅपचाही यात समावेश आहे. आयट्यून्सवर या सर्वांचा परिणाम झाल्याने हे अॅप बंद करुन त्याऐवजी एखादी नवी सेवा कंपनी सुरू करु शकते.

Leave a Comment