रिंकूच्या मेकअपचा टीझर रिलीज


मराठी प्रेक्षकांसाठी रिंकू राजगुरू हे नाव काही नवे नाही. रिंकू शिवाय दुसऱ्या कोणाला क्वचितच एका रात्रीत स्टार होणे काय असते हे माहीत असेल. रिंकू सैराट चित्रपटानंतर तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाली. सैराट चित्रपट येऊन गेलाही पण आर्चीची अर्थात रिंकूची क्रेझ आजही तसूभरही कमी झालेली नाही. तिचा कागर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तिने सैराट आणि कागर या दोन्ही चित्रपटांमध्ये गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. पण लवकरच रिंकू आता शहरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या मेकअप चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

रिंकू बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवर मद्यपान करताना गणेश पंडित लिखीत आणि दिग्दर्शित मेकअप चित्रपटाच्या या टीझरमध्ये दिसते. ती मद्यधुंद अवस्थेत शहराला आणि घरच्यांना शिव्याही देत आहे. तिच्या प्रत्येक वाक्यात तिला मेकअप करायला न दिल्याचा राग दिसतो. शोले चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या त्या सीनची आठवण हा टीझर पाहून आल्यावाचून राहत नाही. चित्रपटाचा विषय नक्की काय असणार याचा अंदाज टीझरवरून बांधता येत नसला तरी विषय वेगळा असेल असेच प्रेक्षकांना वाटत आहे.

गणेश पंडित या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याआधी अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी आणि मालिकांसाठी गणेशने लेखन केले आहे. यात बालक पालक (२०१२), येल्लो (२०१४), बाळकडू (२०१५) आणि हिचकी (२०१८) या चित्रपटांचे लेखन केले आहे.

Leave a Comment