ममतांना चिडवा, मते मिळवा – भाजपची नवी शक्कल


लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काय करू आणि काय नको, असे झाले आहे. त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्याकडून एकामागोमाग चुका होत आहेत. त्यांच्या या अवस्थेचा लाभ भारतीय जनता पक्षाने घेतला नसता तरच नवल. त्यासाठी अगदी जय श्रीराम सारखी क्षुल्लक घोषणाही भाजपच्या पथ्यावर पडली आहे.

पश्चिम बंगालात निवडणुकीच्या काळात सुरू झालेली भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमधील वैमनस्य आता पुढच्या टप्प्यावर गेले आहे. दूर्गापूजेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये आता ‘जय श्रीराम’वरून रणधुमाळी सुरू झाली आहे.

याची सुरूवात झाली पूर्व मेदिनीपुर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान. त्यावेळी ममतांचा ताफा जात असताना काही भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या ममतांनी त्यातील एका व्यक्तीला अटक करविले. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्याला निवडणुकीचा मुद्दा बनविले. यामुळे काही अंशी मतांचे ध्रुवीकरण झाले आणि त्याचा लाभ भाजपला झाल्याचे बव्हंशी मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर अशा अनेक घटना घडल्या. उलट भाजपच्या दृष्टीने ही अगदीच सोपी क्लृप्ती ठरली. ममता बॅनर्जी आल्या की ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्या आणि त्यांना चिथावणी द्या, असा हा सोपा फॉर्म्युला भाजपला सापडला.

‘जय श्रीराम’मुळे निर्माण झालेल्या या वादाने तृणमूलच्या विरोधातील एका आंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृणमूलने ‘जयहिंद वाहिनी’ आणि ’बंगजननी वाहिनी’ अशा संघटनांची स्थापना केली आहे. त्यातून भाजपशी सामना करण्याची ममतांची योजना आहे. ‘जय श्रीराम’ ही धार्मिक घोषणा नसून राजकीय घोषणा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय घोषणा आम्ही कदापी खपवून घेणार नाही,’ असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

पुढच्या वर्षी राज्यात विविध नगरपालिकांच्या निवडणुका असून 2021 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या मुद्द्याचा पूरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले दहा लाख पोस्टकार्ड पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याला उत्तर म्हणून तृणमूलने अर्जुन सिंह यांचा व्हाट्सअॅप क्रमांक दिली असून त्यावर त्यांना ‘जय बंगाल‘ असे अभिवादन पाठविण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावत तब्बल 18 जागा मिळविल्या. लोकसभेचे हे निकाल हा आपला वैयक्तिक पराभव असल्याचे ममता यांनी मानले असून त्याचा उतारा म्हणून अधिक कठोर स्वीकारले आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला हाजिरी लावण्याचे कबूल करूनही त्यांनी ऐनवेळी रद्द होते. खरे तर हा त्यांचा वैयक्तिक अधिकार होता. देशातील अनेक मुख्यमंत्र्यांनी या समारंभाला उपस्थित राहणे टाळले. त्यांच्या प्रमाणेच ममताही गैरहजर राहिल्या असत्या तर फारशी चर्चा झाली नसती. मात्र बंगालमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना शपथविधीसाटी निमंत्रण दिल्याचे कारण पुढे करून त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना कोलितच दिले.

पश्चिम बंगालमध्ये वर्षानुवर्षे माकपची सत्ता होती. माकपच्या गुंडगिरीच्या विरोधात ममतांनी रान उठविले म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. ; परंतु माकपच्या काळात असलेली गुंडगिरी पुन्हा ममतांच्या काळातही अनुभवाला येत आहे, ही बंगालच्या जनतेची खरी तक्रार आहे. भाजपसोबतच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही मारहाण केली जाते; त्यांचे बळी घेतले जातात. इतकेच काय पण माकप व भाकप या डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही हत्या झाल्या आहेत आणि त्या सर्वांची नाराजी ममतांना भोवली आहे.

वास्तविक एक संघर्षशील राजकीय नेत्या म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढणे, 2011 च्या निवडणुकीत 34 वर्षे जुन्या डाव्या आघाडीचे सरकार उलथवणे आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हातभर अंतरावर ठेवणे, या साध्या गोष्टी नाहीत. मात्र आपल्या या शीघ्रकोपी स्वभावामुळे त्यांनी त्या कामगिरीवर पाणी फिरवण्याचेच कार्य केले आहे.

Leave a Comment