‘ड्राय-डे’ची संख्या कमी करणार राज्य सरकार


नागपूर – ड्राय-डे कमी करण्याच्या तयारीत राज्य सरकार असून राज्य सरकारने त्याकरिता एक समिती गठीत केली आहे. संपूर्ण राज्यभरात या समितीच्या अहवालानंतर ड्राय डेचे दिवस निश्चित केले जाणार आहेत. ड्राय-डे ची संख्या राज्य सरकारने कमी केल्यास महसूलमध्ये वाढ होणार आहे.

राज्यात सध्याच्या व्यवस्थेनुसार सणासुदीच्या काळात प्रत्येक शहरात ड्राय-डे जाहीर केले जातात. विविध जाती धर्माचे लोक प्रत्येक शहरात राहतात. त्यामुळे त्यांचे सण, उत्सव साजरे करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्या-त्या दिवशी शहरात दारू विक्री बंद केली जाते. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या अनुषंगाने ड्राय-डे वेगवेगळे दिवस निश्चित झाले आहेत.

ड्राय-डेची संख्या राज्यात कुठे जास्त तर कुठे कमी होत असल्याने ड्राय-डे कमी करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ड्राय-डेचे दिवस निश्चित केले जातील. तसेच ड्राय-डे कमी करण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Leave a Comment