
नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आहे. भारताला पहिल्या दोन सराव सामन्यांपैकी एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताने या सामन्यांमध्ये केदार जाधवला विश्रांती दिली होती. केदारने आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमधून सावरत विश्वचषक संघातील आपले स्थान पक्क केले आहे. आता आगामी रेस 4 चित्रपटात याच केदार जाधवला संधी मिळणार आहे. याबद्दलचे संकेत खुद्द रोहित शर्माने दिले आहेत.
रेस 4मध्ये झळकणार केदार जाधव !
रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामना संपल्यानंतर बसमधून प्रवास करत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रोहितने या व्हिडीओत रविंद्र जाडेजा आणि केदार जाधवसोबत गप्पा मारल्या आहेत. रोहितने जाडेजाच्या खेळीचे कौतुक केल्यानंतर गमतीमध्ये केदार जाधवला रेस 4 चित्रपटात संधी मिळणार असल्याचे म्हटले आहे. केदारनेही रोहितच्या या मस्करीला तितकेच समर्पक उत्तर देत, होय मला विचारण्यात आले असून सध्या मानधनावर चर्चा सुरु असल्याचे म्हणत केदारने देखील रोहितच्या मस्करीला तितकीच दिलखुलास दाद दिली आहे.
