महिलांसाठी आता खास मासिक पाळीसाठी पिरियड पँटीज्


मनुष्यजातीचे जितकेही प्रकार निर्माणकर्त्याने बनवले आहेत, स्त्रियांना त्यामध्ये काही विशेष गुण आणि कर्तव्ये बहाल केली. स्त्रीला यामध्ये मिळालेले मातृत्व सर्वात महत्वाचे वरदान आहे. स्त्री फक्त याच गोष्टीसाठी महिन्यातील ‘ते’ चार दिवस त्रास सहन करते. एकेकाळी निषिद्ध मानला गेलेला विषय सध्याच्या घडीला मोकळेपणाने बोलला जाऊ लागला आहे. मासिक पाळीकडे पूर्वीच्या काली जसे पहिले जात होते ती परिस्थिती सध्या नाही. स्त्रियांचा त्या चार दिवसांत आराम, त्यांचे मूड स्विंग सांभाळणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे अशा सर्व गोष्टी जातीने पुरुष करतात. स्त्रियांची मासिक पाळीमधील चीडचीड लक्षात घेऊन ते चार दिवस कंफर्टेबल, आरामदायी जावेत म्हणून आजकाल बाजारात पिरियड पँटीज् उपलब्ध झाल्या आहेत.

अशा पिरियड पँटीजचा बाहेर देशामध्ये सर्रास वापर केला जातो, पण ही संकल्पना भारतात अजूनही रुजली नाही. या पिरियड पँटीमध्ये मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव शोषून घेण्याची 12 टक्के जास्त क्षमता असते. याचा पॅड आणि टेम्पोनच्या तुलनेत वापर अतिशय सोयीस्कर आहे. महत्वाचे म्हणजे या पिरियड पँटीसोबत ज्यादा पॅड्सही मिळतात. तुमचा रक्तस्त्राव जास्त असेल तर तुम्ही पँटीच्या आतमध्ये या पॅड्सचा उपयोग करू शकता. जसा फील नेहमीची पँटी घातल्यावर येतो अगदी तसाच फिल ही पिरियड पँटी घातल्यावर येतो असे अनेक महिलांनी मत नोंदवले आहे.

पिरियड पँटी बनवण्यासाठी पॉलीयुरेथन लॅमिनेट आणि अशाच प्रकारच्या लॅमिनेटेड मटेरिअलचा वापर हा केला जातो. वॉटरप्रूफ हे कापड समजले गेल्यामुळे या पँटी लघवीची समस्या असेल तरीही तुम्ही वापरू शकता. तुम्ही पिरियड पँटी या पुन्हा व्यवस्थित धुवून वापरू शकता. मात्र त्यातील पॅड्स तुम्हाला प्रत्येकवेळी बदलावे लागतील.

पिरियड पँटीमुळे कोणताही दुर्घंध येत नाही. जो ओलेपणा पॅड्सच्या वापरण्याने जाणवतो तो यामध्ये जाणवत नाही. ही पँटी तुम्हाला पॅड्सप्रमाणे वारंवार बदलावी लागत नाही. तसेच ही सरकण्याचीही भीती नाही. यात द्रव शोषून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने लांबच्या प्रवासात तुम्ही याचा सहज उपयोग करू शकता. पिरियड्समध्ये जास्तीत जास्त चार तास पॅड्सचा वापर करता येतो पण तुम्ही पिरियड पँटीचा वापर 12 तासांपर्यंत करू शकता.

अशा पँटीज सध्या अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचा साईझ आणि आवडत्या रंगानुसार याची खरेदी करू शकता. दरम्यान, ट्रान्सपरन्सी मार्केट रिसर्चने प्रकाशित केलेल्या एका नवीन अहवालानुसार, 2017 मध्ये ग्लोबल पिरियड पॅंटीजचे मार्केट 67.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे होते आणि 2026 पर्यंत ते 279.3 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment