सावरकरांची बदनामी हा तर कृतघ्नपणा!


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून म्हणजे 2004 पासून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात विपर्यस्त वक्तव्ये केली आहेत. भारतीय जनता पक्ष हा धर्मवादी पक्ष असून त्या पक्षाच्या विचारसरणीमुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाला धोका आहे, असे राहुल व काँग्रेस यांचे म्हणणे आहे. त्यांना आपले मत बनविण्याचा आणि ते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि आजन्म मातृभूमीची सेवा करणाऱ्या वीरांबद्दल वावगे बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. त्यांच्या या आगळीकीबद्दल त्यांना न्यायालयीन खटल्यालाही सामोरे जावे लागले आहे आणि ती खटलेबाजी टाळण्यासाठी त्यांना खूप खटाटोप करावे लागले आहेत. दुर्दैवाने राहुल यांचीच री त्यांच्या पक्षाचे अन्य नेतेही ओढत आहे.

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केले. त्याच वेळेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वा. सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून आपली पातळी दाखवून दिली. सावरकर हे द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक असून त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांताची कल्पना मांडली आणि त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती स्वीकारली, असे बघेल म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य केवळ इतिहासाचे अज्ञान दाखवणारेच नाही तर त्यांच्या मनातील द्वेष दाखवणारेही आहे. मात्र बघेल हे एकटे नाहीत. यापूर्वी दिग्विजय सिंह आणि मणिशंकर अय्यर यांनीही याच प्रकारची वक्तव्ये केली होती.

हिंदू व मुसलमान हे एकाच देशातील दोन राष्ट्रे (कौम) आहेत, हा सिद्धांत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी 1867 साली सर्वप्रथम मांडला. पुढे 1887 पासून त्यांनी तो सातत्याने पुढे मांडला. यावेळी सावरकरांचे वय केवळ चार वर्षांचे होते. भारतीय समाजात फुटीरतेची बीजे सर सय्यद अहमद यांनी पेरली. त्यांचाच कित्ता पुढे जीना आणि कवी इकबाल यांनी गिरवला. असे तरीही काँग्रेस आणि अन्य ‘धर्मनिरपेक्ष’ गटातील लोक या सिद्धांतासाठी सावरकरांना जबाबदार धरतात आणि फाळणीसाठी त्यांना दोष देतात.

त्याच प्रकारे स्वा. सावरकर यांचा ‘देशभक्त’ आणि ‘क्रांतिकारक’ असा उल्लेख काढून त्याऐवजी त्यांचा ‘कारागृहातून बाहेर येण्यासाठी इंग्रजांची क्षमा मागणारी व्यक्ती’ असा उल्लेख करण्याचाही वारंवार प्रयत्न होतो. गेल्याच आठवड्यात राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकांत बदल करून दहावीच्या पुस्तकातील धड्यामध्ये असा उल्लेख केला.

वास्तविक तुरुंगातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे तर सर्वच क्रांतीकारकांची रणनीती होती. सावरकर यांच्याप्रमाणे सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली आणि पुढे कामही चालू ठेवले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतीकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटीश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक बंदीवान असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी सावरकर यांना मुक्त केले नव्हते तर 14 वर्षे कारागृहात आणि नंतर 13 वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तरीही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची हात जोडून क्षमा मागितली’, असे खोटे वक्तव्य गेल्या महिन्यात एका प्रचार सभेत केले होते. त्याबद्दल ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली होती.

खरे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धे असलेल्या स्वा. सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांची रवानगी अंदमानमधील काळ्या पाण्यावर केली गेली होती. त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. बाकी काही नाही तरी त्याबद्दल तरी त्यांच्याबद्दल आदर बाळगावा. परंतु त्यांच्यावर सातत्याने असे खोटे आरोप करणे हा क्रांतिकारकांबद्दल कृतघ्नपणा आहे.

Leave a Comment