आयसीसीचे 7 नियम या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच होणार लागू


30 मेपासून इंग्लंडमध्ये यंदाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. 10 संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार असून यात नवे नियम लागू केले जाणार आहेत. गेल्या विश्वचषक स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 नियम बदलण्यात आले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ते सर्व नियम लागू केले जाणार आहेत.

चेंडू हेल्मेटला लागून झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. पण, फलंदाजाला हँडल द बॉलच्या परिस्थितीत बाद दिले जाणार नाही. दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजांच्यात समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.

आयपीएलवेळी रनाआउटचा मुद्दा चर्चेत आला होता. बॅट स्टम्पिंगवेळी रेषेवर असताना नॉटआउट दिले जात होते पण यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिले जाणार आहे. फलंदाजाचा पाय किंवा बॅट जर क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल. जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.

पंचांना एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत. फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.

Leave a Comment