अनेक ‘दबंग’ भूमिकांनंतर आता ऐतिहासिक भूमिकेमध्ये दिसण्याची इच्छा


‘दबंग’ खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ दर्शकांच्या चर्चेचा विषय ठरत असून, या चित्रपटाबद्दल दर्शकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सलमानचा ‘भारत’ ईदच्या दिवशी, म्हणजेच पाच जून रोजी दर्शकांच्या भेटीला येत असून, चित्रपटातील कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. बॉलीवूडमध्ये सध्या ऐतिकासिक आणि बायोपिक चित्रपटांची चलती असून, बहुतेक सर्वच मोठे कलाकार कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये किंवा एखाद्या बायोपिकमध्ये झळकत आहेत. अभिनेता सलमानला देखील ऐतिहासिक भूमिकेमध्ये दिसण्याची इच्छा असून, आपल्याला कधी संधी चालून आली, तर ‘चंगेझ खाना’ची भूमिका साकारण्यास आवडेल असे सलमानने म्हटले आहे.

चंगेझ खानाची भूमिका नकारात्मक असली, तरी देखील आपल्याला ती भूमिका साकारण्यास नक्कीच आवडेल असे सलमान म्हणतो. सध्या सलमानदेखील ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त असून, या चित्रपटामध्ये सलमान सोबत कतरिना कैफही दिसणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आधीच प्रसिद्ध करण्यात आले असून, या चित्रपटातील गीतांनाही दर्शकांनी पसंतीची पावती दिली आहे. त्याचबरोबर ‘दबंग -३’ही सध्या चर्चेचा विषय ठरत असून, या वर्षाच्या शेवटी, नाताळाच्या दिवशी दर्शकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असून, या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मध्य प्रदेशमध्ये सुरु आहे.

Leave a Comment