सूपच्या भांड्यामध्ये अचानक स्फोट, सोशल मिडीयावर व्हिडियो व्हायरल


चीनमध्ये सोशल मिडीयावर एक धक्कादायक व्हिडियो अलीकडेच व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये एका भांड्यामध्ये उकळते सूप दिसत असून, हे सूप उकळून अचानक स्फोट झाल्याप्रमाणे उसळून भांड्याच्या बाहेर आले आणि त्यामुळे या महिलेच्या चेहऱ्याला भयंकर इजा झाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. या व्हिडियोचे फुटेज चीनमधील युन्नान प्रांतातील कुन्मिंग येथे अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘हायडीलाओ’ या नामांकित रेस्टॉरंटच्या लाऊंजमध्ये चित्रित करण्यात आले आहे. हायडीलाओ रेस्टॉरंटच्या अनेक शाखा चीनमध्ये असून, हे चीनमधील अतिशय लोकप्रिय रेस्टॉरंट्स पैकी एक आहे.

या व्हिडियोमध्ये रेस्टॉरंटमधील एका टेबलशी एक दाम्पत्य बसले असून, त्यांच्यासाठी हे गरमागरम सूप सर्व्ह करण्यात आले होते. चीन देशामध्ये सूप हे वेगवेगळ्या बाउल्समध्ये दिले जात नसून, ‘हॉटपॉट’ मध्ये सर्व्ह करण्याची पद्धत आहे, जेणेकरून ग्राहकांना उकळते सूप त्यांच्या गरजेप्रमाणे आपापल्या बाऊलमध्ये वाढून घेता येते. अचानक या दांपत्यापैकी एकाचा जळता सिगरेट लायटर सूपच्या ‘हॉटपॉट’ मध्ये पडला. तिथे जवळच असलेल्या वेट्रेसने हा प्रकार पहिला, आणि सूपमध्ये पडलेला लायटर बाहेर काढण्यासाठी या वेट्रेसने मोठ्या चमचा सूप मध्ये बुडविला मात्र, अचानक मोठा स्फोट झाला, आणि उकळते सूप या वेट्रेसच्या चेहऱ्यावर उडाले. टेबलशी भोजनासाठी बसलेल्या दाम्पत्याच्या अंगावरही उकळते सूप उडाले.

या दांपत्यापैकी एकाला आणि जिच्या चेहऱ्यावर सूप उडाले त्या वेट्रेसला गंभीर इजा झाली असून, त्यांना त्वरित रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेण्यात आल्याचे समजते. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाकडून घडल्या प्रकारची चौकशी केली जात असून, हा प्रकार नक्की कसा घडला हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये असे धोकादायक प्रकार पुन्हा घडू नये या दृष्टीनेही खबरदारी घेतली जात असल्याचे व्यवस्थापनाच्या वतिने सांगण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment