हुवाई – अमेरिकेचा निर्णायक आघात आणि भारत


हुआवाई ही चिनी कंपनी गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्या वादात सापडली आहे. या कंपनीशी व्यवहार करण्यावरून पाश्चिमात्य देशांमध्ये निरनिराळी मते व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या धाडसी स्वभावाला अनुसरून हुआवाईवर आता निर्णायक प्रहार केला आहे. अमेरिकी सरकारने आपल्या देशातील कंपन्यांना हुआवाई तसेच अन्य अनेक चिनी कंपन्यांशी व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. यामुळे जागतिक दूरसंचार आणि मोबाईल हँडसेट बाजारावर दूरगामी परिणाम होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अमेरिकी सरकारच्या या पावलावर पाऊल टाकून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीनेही हुआवाईपासून हातभर अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हुआवाईच्या नव्या हँडसेडमध्ये अँड्रॉईड प्रणाली नसणार आहे, असे गुगलने जाहीर केले आहे. गूगल प्ले स्टोरनेही हुआवाईशी आपले नाते संपविले आहे. इंटेल, क्वालकॉम, सिस्को अशा दिग्गज कंपन्यांनीही हुआवाईशी संबंध तोडत असल्याचे जाहीर केले आहे. या कंपन्या चिनी कंपन्यांना सुटे भाग पुरवतात. जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत अँड्रॉईडचा 90 टक्के वाटा आहे. भारतात तर जवळपास सर्वच्या सर्व स्मार्टफोन अँड्रॉईडवर चालतात. त्यावरून या निर्णयाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

ही बंदी घालण्यासाठी अमेरिकी सरकारने जे कारण दिले आहे ते चीन सरकार आणि सेनेशी कंपनीच्या असलेल्या संबंधाचे. अमेरिकी सुरक्षा संस्थांच्या मते हुआवाई आणि चीनची सेना यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. हुआवाईचे उपकरण दूरसंचार जाळ्यातील संवेदनशील माहिती चिनी संस्थांकडे पोचवतील, अशी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर चीनसोबत एखादा वाद निर्माण झाल्यास त्या नेटवर्कमध्ये जाणूनबुजून अडथळा निर्माण केला जाऊ शकतो, असेही म्हटले जाते. भारतासारख्या चीनशी कायम वाद असलेल्या देशासाठी याचे भयानक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्त डोकलामध्ये झालेल्या संघर्षासारखी परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी चिनी यंत्रणेवर विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते.

म्हणूनच सहा अमेरिकी सुरक्षा संस्थांनी सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध करून अमेरिकी नागरिकांनी हुआवाई व झेडटीई यांसारख्या चिनी कंपन्यांचे फोन वापरू नये, असा सल्ला दिला आहे. याचा आणखी एक पैलू म्हणजे अमेरिका हुआवाईचा वापर चीनशी चालू असलेल्या व्यापारयुद्धात वरचढ ठरण्यासाठी करत आहे, असे म्हटले जाते.

अमेरिकी सरकार आणि या कंपन्यांचे हे निर्णय भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. याचे कारण म्हणजे चीनमधील खासगी क्षेत्रातील ही बहुराष्ट्रीय कंपनी जगातील सर्वात मोठी दूरसंचार नेटवर्क उपकरण पुरवठादार आणि मोबाईल हँडसेट बनविणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. वर्ष 2018 मध्ये कंपनीचा महसूल 10,500 कोटी डॉलरपेक्षा अधिक होता.

हुआवाईने हुआवाई आणि ऑनर या ब्रँडचे एकूण 20 कोटींपेक्षा अधिक मोबाईल एकट्या 2018 या वर्षी विकले. ते सर्व अँड्रॉईड फोन होते. आता हुआवाईने एखादी पर्यायी ऑपरेटिंग सिस्टिम बनवली नाही आणि ते वापरण्यासाठी ग्राहकांना तयार करू शकली नाही, तर कंपनीला मोठे नुकसान होऊ शकते. किंबहुना हुआवाई या उद्योगातून बाहेरच फेकल्या जाऊ शकते.

याहूनही महत्त्वाचे म्हणजे ही जगातील दूरसंचार नेटवर्क उपकरणांच्या पुरवठ्यावर हुआवाईचा जवळजवळ एकाधिकार आहे. अमेरिकी कंपन्यांशी व्यवहार थांबविण्यामुळे हुआवाईच्या पुरवठा शृंखलेवर प्रतिकूल परिणाम होईल. त्यांच्याकडचा साठा संपल्यानंतर सध्याच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करणे आणि देखभाल करणे अत्यंत अवघड होईल. भारतात तसेच अन्य ठिकाणी 5जी सेवांसाठी हुआवाई हे एकमेव नाव आहे. अशा ठिकाणी 5जी सेवा देणे मुश्किल होऊ शकते. त्यामुळे भविष्याची तरतूद करण्याविषयी त्यांना विचार करावाच लागेल. एरिक्सन आणि नोकिया यांसारख्या कंपन्या सुटे भाग पुरवतात, मात्र त्या छोट्याही आहेत आणि महागही. त्यामुळे त्या हुआवाईचा मुकाबला करू शकत नाहीत.

चीनशी भारताचे संबंध फारसे चांगले आहेत, असे नाही. त्यामुळे अमेरिकेने घातलेली ही बंदी व त्यासाठी दिलेली कारणे यांचा विचार 5जी वेंडर म्हणून हुआवाईची निवड करणाऱ्या धोरण निर्मात्यांनी करायला हवी. देशात 5जी सेवा वेळेवर सुरू होतील आणि 5जी नेटवर्कच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याची निश्चिती त्यांनी द्यायला हवी. त्यासाठी हुआवाईकडून स्पष्ट हमी घ्यायला हवी.

Leave a Comment